धाराशिव (प्रतिनिधी)-गेल्या वर्षभरापासून धाराशिव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात चोरी करुन दहशत मजविणाऱ्या चोरट्यांच्या टोळीने धुमाकूळ घातला होता. मात्र, अट्टल गुन्हेगार पोलिसांना हुलकावणी देऊन फरार होत होते. मात्र नूतन पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी पदभार स्वीकारून या अट्टक गुन्हेगारांचा बिमोड करण्याचा आदेश त्यांनी पोलिसांना दिले. त्यानंतर अट्टल गुन्हेगार असलेल्या टोळीच्या म्होरक्याला अटक केली आहे. तसेच त्याच्या ताब्यातून चोरी केलेले 8 तोळे सोने तसेच चोरीसाठी वापरीत असलेली मोटरसायकल असा एकूण 3 लाख 87 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
जिल्ह्यातील मालाविषयी गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन मालाविषयी गुन्हे उघडकीस आणणे व पाहिजे फरारी आरोपीचा शोध घेण्यासाठी पेट्रोलिंग करीत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, लातूर तालुक्यातील मुरुड येथील कृष्णा ऊर्फ पिंटु खडेल शिंदे याने धाराशिव जिल्ह्यातील चोरी व घरफोडीचे अनेक गुन्हे केलेले आहेत. तसेच तो आता कळंब तालुक्यातील वाठवडा शिवारात एका हॉटेल समोर थांबलेला आहे. त्यावरून त्या पथकाने मिळालेल्या माहितीप्रमाणे जावून आरोपीचा शोध घेतला असता आरोपीस पोलीसांचा संशय येताच आरोपीने तेथून पळण्याचा प्रयत्न केला. परंतू पथकातील पोलिसांनी पाठलाग करून आरोपी शिंदे यास पकडून ताब्यात घेतले. यावेळी स्थानिक गुन्हा शाखेने कसून चौकशी केली असता त्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोऱ्या केल्याचे सांगितले. पुढील कार्यवाहीसाठी गुन्ह्यातील मुद्देमालासह आरोपी शिंदेला आनंद नगर पोलीस ठाण्यात हजर केले आहे. त्यांच्याकडून धाराशिव जिल्ह्यातील घरफोडीचे एकूण 15 गुन्हे उघड केले आहेत.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक रितु खोकर व अपर पोलीस अधिक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि अमोल मोरे, सचिन खटके, अंगुलीमुद्रा शाखेचे सपोनि सुधीर कराळे, पोलीस हवालदार विनोद जानराव, प्रदीप वाघमारे, नितीन जाधवर, पोलीस नाईक बबन जाधवर, योगेश कोळी, अंगुलीमुद्रा शाखेचे पोलीस हवालदार मनोज जगताप, चालक पोलीस हवालदार महेबुब अरब, प्रकाश बोईनवाड, विनायक दहीहंडे यांचा पथकाने केली आहे.