धाराशिव (प्रतिनिधी)- दि. 9 जून 2025 रोजी शिवराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा धाराशिवची सहविचार सभा संपन्न झाली. याप्रसंगी राज्य कार्यकारीनीतर्फे राजनेते सनीदेवल जाधव, राज्य कार्याध्यक्ष शेषरावजी बिराजदार, राज्य कोषाध्यक्ष सत्यनारायण साळुंके, मारुती देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. श्री किशोर पाटील यांनी धाराशिव जिल्हा कार्यकारणीचे आजवरचे कार्य विशद केले. सत्यनारायण साळुंखे यांनी बिंदूनामावली दुरुस्ती व आंतरजिल्हा बदल्यात कोकण समावेश व कार्यमुक्ती यासाठी आजवर संघटनेने राज्यस्तरावर दिलेला लढा विषद केला.
आजच्या या सहविचार सभेत लोकशाही पद्धतीने व एकमताने धाराशिव जिल्हा कार्यकारणीचे पुनर्गठन करण्यात आले. राज्य प्रतिनिधी म्हणून किसनराव जावळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. धाराशिव जिल्ह्याचे अध्यक्ष पद श्री गणेश कदम यांच्याकडे सोपवण्यात आले. जिल्हा उपाध्यक्ष पदी मनोज शिंदे तर जिल्हा कार्याध्यक्ष किशोर पाटील व सरचिटणीस राजेश चोबे यांची निवड करण्यात आली. जिल्हा कोषाध्यक्ष पदी श्री सोमनाथ गोंडगिरे यांची निवड करण्यात आली.
सहजविचार सभेनंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांची भेट घेऊन आंतरजिल्हा बदली व अन्यकारक संच मान्यता जीआर / निकष रद्द करणे व इतर प्रश्नांसंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. आमदार महोदयांनी दोन्ही मागण्याबाबत योग्य पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. दुर्दैवी संचमान्यता निकष विरोधात सभागृहात आवाज उठवण्याची त्यांनी हमी दिली. जिल्हाअंतर्गत बदल्या बरोबर अंतरजिल्हा बदल्या तातडीने करण्याबाबत सचिवांना मी पत्रव्यवहार करतो असेही त्यांनी सांगितले.
संघटनेच्या आजवरच्या कार्याची पोचपावती म्हणून कृतज्ञतेच्या भावनेतून नामोल्लेख न करण्याच्या अटीवर एका शिक्षकाने आपल्या पत्नीचा पहिला पगार शिवराज्य शिक्षक संघटनेला स्वेच्छा निधी म्हणून सुपूर्द केला. राज्यनेते सनिदेवल जाधव यांनी त्यांचे विशेष आभार मानले. “शिवराज्य“च्या नूतन धाराशिव जिल्हा शाखेतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांकडून अभिनंदन करण्यात आले. आजच्या सहविचार सभेच्या यशस्वी आयोजनात योगदान देणाऱ्या सर्व शिलेदारांचे व राज्य कार्यकारणीतर्फे उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचे राज्य कोषाध्यक्ष सत्यनारायणजी साळुंके यांनी आभार मानून सभेची सांगता झाली.