भूम,(प्रतिनिधी)- महावितरणकडून भूम शहर व तालुक्यात सर्वसामान्य वीज ग्राहकांवर जबरदस्तीने प्रीपेड (रिचार्ज) मीटर बसवले जात असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस व शिवसेना (उबाठा गट) तसेच राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाने उपकार्यकारी अभियंता, महावितरण उपविभाग भूम यांना निवेदन दिले. यावेळी त्यांनी इशारा दिला की, ग्राहकांच्या मर्जीविरुद्ध जर प्रीपेड मीटर बसवले गेले, तर संपूर्ण तालुक्यात तीव्र जनआंदोलन छेडले जाईल.

दि. २९ जुलै २०२४ रोजी विधानसभेत तत्काळीन ऊर्जामंत्री, उपमुख्यमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्र फडणवीस यांनी मा.आ. भाई जगताप व मा.आ. सतेज पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्टपणे सांगितले होते की, सर्वसामान्य ग्राहकांवर प्रीपेड मीटर बसवण्याची सक्ती होणार नाही. तरीदेखील महावितरणकडून फॉल्टी मीटर बदलण्याच्या नावाखाली सर्रास प्रीपेड मीटर बसवले जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

निवेदनात नमूद केले आहे की, वीज कायदा २००३ च्या कलम ५५ नुसार ग्राहकाला मीटर निवडीचे स्वातंत्र्य आहे. मात्र, प्रीपेड मीटर बसवून ग्राहकांची मालकी, निर्णय व सुविधा हिरावून घेतली जात आहे. यामुळे ग्रामीण भागातील अशिक्षित व गोरगरीब जनतेला आर्थिक बोजा सहन करावा लागत आहे. यामध्ये स्मार्टफोनचा वापर, रिचार्जची गरज, वाढीव वीजबिल, तांत्रिक अडचणी यामुळे ग्राहकांना गंभीर त्रास होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

यावेळी निवेदन देताना : काँग्रेसचे तालुका प्रमुख रुपेश (आप्पा) शेंडगे, जिल्हा उपाध्यक्ष विलास शाळू, शिवसेना उबाठा गटाचे तालुकाप्रमुख अनिल (दादा) शेंडगे,अमोल सुरवसे, महादेव जाधव, व  केदारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

स्थानिक वीज ग्राहकांच्या वतीने करण्यात आलेल्या या मागणीला प्रशासनाने गांभीर्याने घ्यावे, अन्यथा जनतेच्या मूलभूत हक्कांसाठी उग्र आंदोलन केले जाईल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.

 
Top