धाराशिव (प्रतिनिधी)-  मत्स्यव्यवसायाला आता कृषीचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे आता मासेमार बांधवांचे जीवनमान उंचावले पाहिजे, मराठवाड्यात मत्स्योत्पादन वाढीला वाव आहे. त्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने मत्स्योत्पादनाच्या वाढीसाठी नियोजनातून पारदर्शक आणि प्रामाणिकपणे काम करावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लातूर मत्स्यव्यवसाय विभागाचा आढावा घेताना राणे बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक रितू खोकर, लातूर मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त शिरीष गाताडे व छत्रपती संभाजीनगरचे प्रादेशिक उपायुक्त विजय शिखरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

राणे म्हणाले की, मत्स्योत्पादनासाठी तलाव ठेक्याने देतांना पारदर्शकता असली पाहिजे. मासेमारी तलावांवर असलेल्या अतिक्रमण काढण्यात यावे. अनेक मासेमारी तलावात गाळ साचलेला आहे. तो गाळ काढण्याचा निर्णय पावसाळा संपल्यानंतर घेण्यात येईल. मासेमारी बांधवांचे किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी बँक अधिकाऱ्यांना भेटून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जिल्हास्तरीय बँकांच्या बैठकीत बँकांना किसन क्रेडिट कार्ड काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करावे. ज्या प्रमाणिकपणे काम करणाऱ्या मासेमारी सहकारी संस्था आहेत, त्यांना मदत करण्यात यावी. मत्स्यव्यवसाय विभाग हा आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे, यासाठी जास्तीत जास्त मत्स्योत्पादन वाढले पाहिजे, असे राणे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील मत्स्य उत्पादन वाढीला चालना देण्यात येईल, असे सांगून जिल्हाधिकारी पुजार यांनी अधिक माहिती दिली.  लातूर विभागाचे प्रादेशिक उपायुक्त गाताडे यांनी लातूर विभागांतर्गत येणाऱ्या लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यातून 45 कोटी 55 लाख 246 इतका महसूल प्राप्त झाल्याची माहिती दिली.  या आढावा बैठकीला मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती तेजास्विनी करळे (लातूर), जे.एस.पटेल (धाराशिव), विक्रम कच्छवे (नांदेड), भास्कर सानप (बीड), अजित सुरवसे (परभणी), डॉ.मधुरिमा जाधव (छत्रपती संभाजीनगर), धाराशिव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ए.एन.मदने, मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रभाकर महामुनी, लघु पाटबंधारे विभागाचे सहायक कार्यकारी अभियंता शैलेश विश्वेकर, मत्स्य व्यवसाय अधिकारी ए.एस.मुसळे (लातूर), ए.डी.देवकते (धाराशिव) आदीची उपस्थिती होती.


 
Top