धाराशिव (प्रतिनिधी)- बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोपी साहेबराव बोबडे (वय 79) यास पाच वर्षे सक्त मजुरी व 3 हजार रूपये दंड तसेच दुसऱ्या कलमांतर्गत 1 वर्ष सक्त मजुरी व 1 हजार रूपये दंड अशी शिक्षा कळंब जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. राजेभोसले यांनी सुनावली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, 26/11/2020 ते 29/11/2020 च्या दरम्यान दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी व त्यानंतर वेळोवेळी यातील आरोपी साहेबराव नारायण बोबडे (वय 79, रा. कोथळा, ता. कळंब) याने वारंवार घरामध्ये बोलावून व पिडिता या अल्पवयीन आहेत हे माहिती असताना सुध्दा पिडितांच्या घरामध्ये कोणी नसताना त्याचा गैरफायदा घेवून त्याच्या घरामध्ये शिरून दोन्ही अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पिडितेच्या आईच्या तक्रारीवरून शिराढोण, ता. कळंब येथील पोलिस स्टेशनमध्ये आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. कलम 376 तसेच बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण 2012 अंतर्गत कलम 4,8,10,12 व कलम 452 भांदवि याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. याचा तपास जी. व्ही. गोडसे पोलिस उपनिरीक्षक पोलिस ठाणे शिराढोण यांनी पूर्ण करून दोषारोपपत्र कळंब येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले. त्यानुसार न्यायालयामध्ये सरकारपक्षातर्फे एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पिडिता वय 13 वर्षे व 6 वर्षे या अल्पवयीन मुलींची साक्ष महत्वपूर्ण ठरली. तसेच अतिरिक्त सरकारी वकील ॲड. अशिष कुलकर्णी यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीस पाच वर्षे सक्त मजुरी व 3 हजार रूपये दंड व दुसऱ्या कलमांतर्गत 1 वर्षे सक्त मजुरी व 1 हजार रूपये दंड अशी शिक्षा कळंब जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. राजेभोसले यांनी सुनावली. 

 
Top