धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव (उस्मानाबाद) रेल्वे स्थानकाचे नामांतर करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढले असून, केंद्र सरकार व रेल्वे विभागाकडून “धाराशिव” हे नाव अधिकृतपणे वापरण्यास मान्यता मिळावी यासाठी कार्यवाही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अटल अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा व धाराशिव तुळजापूर सोलापूर नवीन रेल्वे मार्गचा आढावा घेण्यासाठी धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी रेल्वे स्थानक येथे बैठक घेतली.
या बैठकीच्या वेळी त्यांनी स्थानकाच्या कामाचा दर्जा उच्च राखण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. कामांची नियमित तपासणी करण्यात यावी आणि अहवाल तात्काळ सादर करण्यात यावा. तसेच धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गाचे काम: डिसेंबर 2027 पर्यंत काम पूर्ण व्हावे अशी अपेक्षा आहे. मार्गावरील अडथळे टाळण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाईपलाइन, अंडरपास, रस्त्यांचे नियोजन करावे व नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. नागरिकांनी अपुऱ्या रस्त्यामुळे होणाऱ्या अडचणी निदर्शनास आणल्यानंतर, अंडरपास निर्माण करून मार्ग सुकर करण्याबाबत आदेश देण्यात आले. धाराशिव-लातूर रेल्वे मार्गावरील अंडरपास सिमेंट रस्त्यांचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने, त्याची तात्काळ तपासणी करून सुधारणा करावी. कुमाळवाडी-गड देवदरी रस्ता (मुख्यमंत्री ग्राम सडक योजना) रेल्वे विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राअभावी अर्धवट राहिलेले काम त्वरित पूर्ण करण्यास संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
या बैठकीस आमदार कैलास पाटील, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक शैलेन्द्र परिहार, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक अंशुमाली कुमार, उपमुख्य अभियंता प्रदीप बानसोडे, वरिष्ठ विभागीय व्यापारी व्यवस्थापक योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय अभियंता सेंट्रल रेल्वे अवधोष मीणा, या अधिकाऱ्यांसह रेल्वे स्थानक परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या सूचना गांभीर्याने घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी दिले.