धाराशिव (प्रतिनिधी)- हवामान बदल, दुष्काळ आणि हवामान संकटाची पूर्वसूचना प्रणाली या महत्वपूर्ण विषयाची व्याप्ती जाणून घेवून जिल्हा पत्रकार संघाने आयोजित केलेली कार्यशाळा खूप मौलिक आहे. धाराशिव जिल्ह्यातून एकूण पर्यावरणीय आणि भौगोलिक रचना पाहता, या विषयाची अधिकाधिक माहिती गावखेड्यातील नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी पत्रकारांची ही सजगता निश्चितच कौतुकास्पद आहे. या पुढील काळात अशा पध्दतीने काम करण्यासाठी जिल्हा प्रशासन पत्रकार संघासोबत जिल्हा प्रशासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे मत जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी व्यक्त केले.

गुरूवारी शहरातील हॉटेल समर्थच्या सभागृहात बाईमाणूस रिसर्च मीडिया फौंडेशन, आरएससीडी आणि जिल्हा पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांसाठी ‌‘हवामान बदल, दुष्काळ आणि हवामान संकटाची पूर्वसूचना प्रणाली' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष देवीदास पाठक, सचिव रवींद्र केसकर उपस्थित होते.

प्रशासकीय पातळीवर अनेक योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम आम्ही सातत्याने करतो. त्याकामी देखील प्रसारमाध्यमांची प्रशासनाला मोठी मदत होते. दुष्काळ आणि पर्यावरणासारख्या अत्यंत महत्वाच्या आणि शेतीमातीशी जोडलेल्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यशाळेतून जिल्ह्यासाठी निश्चितच भरीव असे साहित्य तयार होणार आहे. अशा उपक्रमांची समाजासाठी अत्यंत आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी पुजार यांनी यावेळी सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी यावेळी मनोगत व्यक्त करीत असताना, जलजीवन मिशनच्या माध्यमातून जिल्हाभरात सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. दुष्काळामुळे सर्वात मोठा फटका स्त्रियांना सहन करावा लागतो. त्याचे दुष्परिणाम बराच काळ भोगावा लागतो, असे सांगत या कार्यशाळेतून त्यासाठी प्रभावी उपायांबाबत नक्की सक्षम पर्याय समोर येतील, असा विश्वास घोष यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे सचिव रवींद्र केसकर यांनी केले. बाईमाणूस रिसर्च मीडीया फौंडेशनचे सुरज पटके यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार देवीदास पाठक यांनी मानले. यावेळी असर संस्थेच्या अनिता भातखंडे, आरएससीडीचे मुकेश सोनकांबळे, राजश्री पगारे, सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले, एसएसपीच्या तब्बसुम मोमीन, संजना खंडारे, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे संपत काळे, रमेश चादरे, हॅलो मेडिकल फौंडेशनचे बसवराज नरे, लोकप्रतिष्ठानच्या डॉ. स्मिता शहापूरकर, परिवर्तन संस्थेचे मारूती बनसोडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रातील जल व भूमी व्यवस्थापन विभागाचे डॉ. नितीन पाटील यांच्यासह जिल्हाभरातील पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि सदस्य कार्यशाळेस उपस्थित होते.


 
Top