तुळजापूर (प्रतिनिधी)- जगप्रसिद्ध वाराणसी येथील ज्योतिषाचार्य व पद्मश्री पुरस्कार प्राप्त विद्वान गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी आज सायंकाळी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. त्यांनी मनोभावे पूजा-अर्चा व आरती करत देवीच्या चरणी आपली श्रद्धा अर्पण केली.

त्यांच्या या भेटीप्रसंगी मंदिर संस्थानचे विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील व तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे यांनी त्यांचे स्वागत केले. गणेश्वर शास्त्री यांनी मंदिरातील आरतीत सहभागी होत भक्तिभावाने देवीची प्रार्थना केली.

गणेश्वर शास्त्री द्रविड हे भारतातील ख्यातनाम ज्योतिषाचार्य असून अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन व प्राणप्रतिष्ठेच्या मुहूर्ताचे त्यांनी यशस्वी निर्धारण केले आहे. त्यामुळे तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची सद्य भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

नुकत्याच भारत सरकारतर्फे त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले असून, या निमित्ताने मंदिर संस्थानच्या वतीने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी त्यांचा सत्कार केला. या वेळी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) अरविंद बोळंगे, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, आनंद कंदले, सचिन जाधव, सुरक्षा निरीक्षक ऋषिकेश पराडे, दीपक शेळके, स्वच्छता निरीक्षक उमेश गुंजाळ, सुरज घुले, दयानंद जोगदंड तसेच मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 
Top