धाराशिव (प्रतिनिधी) - धाराशिव जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल धनंजय गंगाधर शिंगाडे यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने कराड येथे आयोजित 31व्या नवोदित मराठी साहित्य संमेलनात प्रदान करण्यात आला.

गेल्या तीस वर्षांपासून धनंजय शिंगाडे यांनी धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव योगदान दिले आहे. त्यांनी विविध औद्योगिक संस्थांची स्थापना करून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. यासोबतच, बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी समाजातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. आरोग्य, शिक्षण, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी 30 पेक्षा अधिक संस्था उभारल्या आहेत, ज्या यशस्वीपणे कार्यरत आहेत.

या पुरस्कार सोहळ्याला सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, लोकशाही न्यूज चॅनेलचे विशाल पाटील,शरद गोरे  राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे, आणि  ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत प्रवीण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते शिंगाडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी झी 24 तासचे जिल्हा प्रतिनिधी विश्वस्त अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ज्ञानेश्वर पतंगे, पत्रकार सुधीर पवार, संतोष वतने, अनिरुद्ध कावळे, शंकर अंगरखे, प्रवीण पौळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. धनंजय शिंगाडे यांच्या सामाजिक कार्याबरोबरच त्यांनी राजकीय क्षेत्रातही सक्रिय योगदान दिले आहे. त्यांच्या या व्यापक कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने त्यांना या पुरस्काराने गौरवले आहे.

 
Top