भूम (प्रतिनिधी)- चैञातील कडक उन्हाचा चटका, घामाने ओलेचिंब होवुन गुलालाने रंगलेले लाखो भाविक भक्तिरसात तल्लीन होत “भैरवनाथांच्या रथाचं चांगभलं, भैरवनाथांच्या नावानं चांगभलं “ असा जयघोष करीत भक्तिमय वातावरणात गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण करीत लाखो भाविंकानी श्री काळभैरवनाथांचे दर्शन घेतले. राज्यासह परराज्यांतील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान, कुलदैवत असलेल्या श्री क्षेञ सोनारी ता.परंडा येथील श्री काळभैरवनाथांच्या याञाउत्सवातील मुख्य आकर्षण असणारा “ रथोत्सव “ शनिवार दि. 26 एप्रिल  रोजी मोठ्या आनंद उत्सवात पार पडला. यंदा जुना रथ बदलुन सुंदर नक्षीकाम, कलाकुसरीचा रथ याञेत दाखल होता. सोनारी नगरी लाखों भाविकांनी फुलुन गेली होती. तर गुलालाने माखुन गेली होती.

महाराष्ट्रासह, आंध्रप्रदेश, कर्नाटक, राज्यातील लाखों भाविकांचे श्री काळभैरवनाथ कुलदैवत आहे. भैरवनाथांचे विविध धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत.यातील मुख्य आकर्षण असलेला रथोत्सव शनिवार दि. 26 एप्रिल रोजी ञयोदशी दिवशी कडक रखरखत्या उन्हाची तमा न बाळगता पारंपारिक वाद्यांसह ढोल ताशाच्या गजरात साजरा करण्यात आला. ञयोदशीनिमित्त, पहाटे एक ते तीन वाजेपर्यंत काळभैरवनाथांस महाभिषेक, महापुजा करण्यात आली.दुपारी बारा वाजता महानैवेद्य,तहसीलदार निलेश काकडे यांच्या उपस्थितीत उत्सवमुर्तीची पुजा करण्यात आली.दुपारी दोन वाजता सजवलेल्या रथात “उत्सवमुर्ती“ठेवुन मुख्य रथोत्सवाला सुरुवात करण्यात आली.यावेळी तहसिलदार'  निलेश काकडे,नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर, सुभाषसिंह सद्दीवाल, बाळासाहेब पाटील हाडोंर्गीकर, धनंजय सावंत,याञा कमिटी अध्यक्ष नवनाथ जगताप,आरपीआयचे संजय बनसोडे,पोलीस उपविभागीय अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ,सोनारीचे सरपंच परमेश्वर मांडवे,मंडळाधिकारी,सिद्दिक शेख,ग्रामसेवक हरिचंद्र चौधरी,तलाठी महेबुब आत्तार आदिंसह मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी मंदिर परिसरात भाविकांची तुडुंब गर्दी झाली होती.

रथ मिरवणुकीत रथासमोर कंडारीची मानाची कावड, सांगोल्याची मानाची काठी, देवाचा मानाचा घोडा, हत्ती, सजवलेल्या पालखीसह मिरवणुक उत्सवाला सुरुवात झाली. रथासमोर मंदिराचे मुख्य पुजारी संजय महाराज, समीर पुजारी, मयुर पुजारी सनई चौघड्यात धुपाराती घेऊन चालत होते. दुरगावाहुन आलेल्या भाविकांनी नवसपुर्ती व रथ ओढण्यासाठी मिरवणुक मार्गावर मोठी गर्दी केली होती.

 
Top