धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्यात विविध सण, उत्सव आणि आंदोलनात्मक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी २८ एप्रिल २०२५ रोजी रात्री १ वाजतापासून ते ११ मे २०२५ रोजीचे रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू केला आहे. १४ ते ३० एप्रिलपर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती,२९ एप्रिल - श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती (परंपरेने) व परशुराम जयंती,३० एप्रिल -महात्मा बसवेश्वर महाराज जयंती आणि १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येणार आहे.अपर जिल्हादंडाधिकारी शोभा जाधव यांनी या काळात हे सण - उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये हा आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचे जमाव,मिरवणुका, मोर्चे,घोषणाबाजी,शस्त्र बाळगणे, दाहक पदार्थ व स्फोटके जवळ बाळगणे यावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.
हा आदेश अंत्ययात्रा,धार्मिक विधी, लग्न समारंभ,शासकीय कार्यक्रम व शासकीय कर्मचाऱ्यांवर लागू होणार नाही.परंतु कोणताही मोर्चा,सभा किंवा आंदोलन आयोजित करायचे असल्यास पोलीस अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे. सण-उत्सव,आंदोलने व यात्रा-जात्रांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता राखण्याचा आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा उद्देश या आदेशामागे आहे.