धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवस कृती आराखडा या अभियाना अंतर्गत धाराशिव येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील फार्मसी विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमानाने अवयवदान जागृतता शिबिर नुकतेच अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या फार्मसी विभागात घेण्यात आले.
आज समाजामध्ये अनेक रुग्णांना केवळ एखाद्या निकामी झालेल्या अवयवा वाचून जीवन मारणाशी दैनंदिन झुंज द्यावी लागते. त्याच प्रमाणामध्ये समाजात अनेक जणांचे अपघाताने मेंदू मृत अवस्थेत गेल्याने अशा व्यक्तीच्या शरीरातील अवयव इतरांना दान करता येतात. पण याविषयी जागृती नसल्यामुळे अनेकांना जिवंतपणीच अवयवा अभावी मरण यातना सहन कराव्या लागतात.
केवळ अशा रुग्णांना अवयदान या माध्यमातून चांगले जीवन जगता यावे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या “शंभर दिवस कृती आराखडा “ या अभियाना अंतर्गत नुकतेच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये अवयवदान जागृतता शिबिर घेण्यात आले. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. वीरेश नंदीमठ , शल्यचिकित्सक डॉ. डीकले डॉ.राजशेखर मेनगुडे ,डॉ. शितल पिसाळ ,डॉ. नागेश वाघमारे ,डॉ अनुजा कंदले ,डॉ प्रज्ञावंत रणदिवे आणि डॉ.अक्षय होटकर या डॉक्टरांनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदवला.
यामध्ये फार्मसी विभागातील सर्व विद्यार्थ्यांची मौखिक आरोग्य तपासणी, त्याचबरोबर मिशन ओबेसिटी ,मिशन थायरॉइड स्क्रीनिंग आशा अनेक चाचण्या या विद्यार्थ्यांच्या घेण्यात आल्या. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना अवयव दानाविषयी अधिक माहिती देऊन अवयव दान करणे ही काळाची गरज असून यामध्ये विद्यार्थ्यांचाही महत्वाचा सहभाग असावा याविषयी डॉ. वीरेशनंदी पाटील यांनी माहिती दिली. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने, बी फार्मसी विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. प्रीती माने , कार्यक्रम समन्वयक डॉ.आर बी नन्नवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने म्हणाले की, तेरणाला सामाजिक उपक्रमाचा खूप मोठा इतिहास असून अनेक मोठमोठे वैद्यकीय कॅम्प तेरणा ट्रस्टच्या माध्यमातून जिल्हाभरात नेहमीच राबविले जातात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा हा अभिनव उपक्रम असून या उपक्रमांमधून अनेक लोकांना अवयव दानाविषयी जनजागृती होऊन गरजू लोकांपर्यंत एखादा अवयव पोहोचेल. यावेळी बी फार्मसी विभागाचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी सर्व डॉक्टर्सला सहकार्य करून आरोग्य तपासणी करून घेतली. त्यांच्या मनातील असलेल्या शंकांचेही निरसन करून घेतले. यावेळी बी फार्मसी विभागातील सर्व प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी तपासणीसाठी मदत केली.