धाराशिव (प्रतिनिधी)- आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये पुस्तकांना अनन्यसाधारण असे महत्त्व असून पुस्तकालाच आपले मित्र बनवल्याशिवाय आपले आयुष्य आणि भविष्य आकार घेऊ शकत नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, भगतसिंग अशा काही महान विभूतींचे स्मरण केल्यानंतर स्वतःचे व्यक्तिमत्व घडवण्यात व त्यासोबत समाज घडवण्यात पुस्तकांचे किती जास्त महत्त्व असते हे दिसून येते. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक युवराज नळे यांनी केले.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित जागतिक ग्रंथ दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालय विभागाचे सहाय्यक संचालक सुनील हुसे हे होते. तर कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी ग्रंथालय विभागाचे सहाय्यक संचालक सुनील हुसे यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना पुस्तकांच्या वाचना शिवाय तरुणोपाय नाही, आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर जास्तीत जास्त पुस्तके वाचली पाहिजेत असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल राठोड यांनी केले. तर सूत्रसंचालन तावडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे यांनी मानले. कार्यक्रमास वाचकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.