भूम (प्रतिनिधी)- भूम आगाराचा नियोजनशून्य कारभार दिवसेंदिवस उघड होत चालला आहे. आगार व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणामुळे बसेस वेळेवर सुटत नसून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचा थेट परिणाम प्रवाशांच्या गैरसोयीवर तर होतच आहे, पण आगाराच्या उत्पन्नावरही विपरीत परिणाम होत आहे.
काल रात्री सहा वाजता सुटणारी आरक्षण असणारी भूममुंबई हिरकणी बस (क्रमांक एमएच 14 बीएल 0750) ही बस भूम स्थानकातच लोड न घेतल्यामुळे बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना तब्बल दोन तास रात्री स्टेशन परिसरात बसून राहावे लागले. अखेर साध्या बस (क्रमांक 3102) मधून रात्री आठ वाजता प्रवाशांना पुढे रवाना करण्यात आले. विशेष म्हणजे अनेक प्रवाशांनी हिरकणी बसचे तिकीट काढले होते, तरीही त्यांना साध्या बसने प्रवास करावा लागला. यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानकावर उपस्थित प्रवाशांनी जेव्हा चौकशी केली, तेव्हा सांगण्यात आले की सदर बस लोड घेत नसल्यामुळे पुढे जाणार नाही. ही बाब स्पष्ट करते की भूम आगारात बसेसच्या वेळापत्रकावर, देखभाल व्यवस्थेवर व नियोजनावर कोणताही भर दिला जात नाही.
याच दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेली भूमपरभणी बस सेवा देखील फक्त एक दिवसच सुरु राहिली. त्याबाबत विचारणा केली असता, “कर्मचारी कमी आहेत“ हे नेहमीचे कारण पुढे करण्यात आले.
आगारातील काही कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, बस दुरुस्ती व देखभालीची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. यामुळे बस वेळेवर तयार होत नाहीत. यासोबतच, भूम आगारात एकही कायमस्वरूपी वरिष्ठ अधिकारी नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये जबाबदारीची जाणीवही कमी आहे.
धाराशिव जिल्ह्यातील इतर आगारांना नवीन बसेस मिळाल्या असताना, भूम आगार मात्र त्यापासून वंचित राहिला आहे. यामुळे जुन्या बसेसच्या देखभालीचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. या बसेस रस्त्यात बंद पडतात, प्रवास अर्धवट राहतो, आणि परिणामी प्रवाशांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.
आज दुपारी तीन वाजता, उन्हाच्या कडाक्यात प्रवासी प्रत्येक गाडी मागे धावताना दिसले. स्थानकावर चालू असलेली साऊंड सिस्टिम देखील लहरीपणाने चालू-बंद होत होती. हे दृश्य भूम स्थानकावर गोंधळाचे वातावरण निर्माण करत आहे. प्रवाशांच्या या हालांची दखल घेत विभागीय परिवहन नियंत्रकांनी तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे. तोट्यात चाललेल्या आगाराला फायदेशीर बनवण्यासाठी कठोर निर्णय आणि सुधारणा आवश्यक आहेत. अन्यथा भूम आगाराचा विश्वास प्रवाशांच्या मनातून पूर्णतः गमावण्याची वेळ येईल.