धाराशिव,(प्रतिनिधी) -धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती अश्वारुढ पुतळा उभारणीसाठी प्रशासकीय मान्यता देण्याकरिता सहकार्य करावे, अशी मागणी महाराष्ट्र कुणबी मराठा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. तुकाराम शिंदे यांनी राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

निवेदनात म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराज चौक ढोकी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती अश्वारुढ पुतळा उभारण्याच्या मागणीसाठी ढोकी व परिसरातील शिवप्रेमींकडून प्रशासकीय पातळीवर वेळोवेळी निवेदने देण्यात आलेली आहेत. लातूर-बार्शी-पुणे महामार्गावर असलेल्या ढोकी गावाची लोकसंख्या 25 ते 30 हजाराच्या जवळपास आहे. त्यामुळे येथील शिवप्रेमींची पुतळा उभारावा अशी मागणी आहे. याकरिता विविध पातळीवर मान्यता मिळण्याकरिता पालकमंत्री या नात्याने आपले सहकार्य मिळणे गरजेचे आहे. तरी ढोकी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती अश्वारुढ पुतळा उभारण्यास प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी आपल्या पातळीवरुन प्रयत्न करावेत असे अ‍ॅड. तुकाराम शिंदे यांनी निवेदनात नमूद केले आहे.


 
Top