धाराशिव  (प्रतिनिधी)- तालुक्यातील कावलदरा येथील शेतकरी अरूण राजेंद्र पवार यांनी त्यांच्या जमिनीवर बेकायदेशीररित्या पवनचक्कीचे पोल उभारण्यात आल्याचा आरोप केला असून, न्याय न मिळाल्यास दि. 17 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या अर्जात नमूद केले आहे की, त्यांच्या वडिलांच्या नावावर असलेल्या गट क्र. 82 आणि 79 या जमिनींपैकी फक्त गट क्र. 79 मध्ये पोल उभारण्यासंदर्भात त्यांनी संबंधित कंपनी रिन्यु वायु उर्जा प्रा. लि. सोबत करार केला होता. मात्र, कंपनीने कोऱ्या स्टॅम्पवर खोटे कागदपत्र तयार करून, त्यांच्या गट क्र. 82 मध्येही पोल उभारले आणि तारा ओढल्या.

यासंदर्भात तक्रार करूनही पोलिस आणि प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नसल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी सुनावणीवेळी योग्य कागदपत्रे सादर करूनही उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधातच स्थगिती आदेश काढल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित कंपनीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा, 17 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

 
Top