धाराशिव (प्रतिनिधी)- एन सी इ आर टी दिल्ली मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित ऑल इंडिया चिल्ड्रन्स ऑडिओ-व्हिडिओ ई-स्पर्धा 2025 मध्ये संतोष केंद्रे दिग्दर्शित 'चिंगी' या लघुपटाने राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. 28 मार्च रोजी NERIE (NORTH EAST REGIONAL INSTITUTE ) शिलाँग येथे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात CIET NCERT चे संयुक्त संचालक अर्मेंद्र बेहरा आणि NERIE शिलाँगच्या प्राचार्या फ्लोरेटा दखर यांच्या हस्ते शौर्या संतोष केंद्रे यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
शौर्या संतोष केंद्रे यांनी सादर केलेल्या 'चिंगी' या लघुपटाने सामाजिक आशय आणि प्रभावी मांडणीमुळे परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे, संतोष केंद्रे यांच्या लघुपटांना यापूर्वीही तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून, सलग चार वर्षे प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवण्याचा मान त्यांनी आपल्या नावावर केला आहे. सध्या ते जिल्हा परिषद शाळा धारेगाव येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण आणि सामाजिक विषयांवरील नावीन्यपूर्ण दृष्टीकोन हा त्यांच्या चित्रपटांचा विशेष पैलू मानला जातो.
स्पर्धेत महाराष्ट्रातील इतर काही कलाकृतींनाही राष्ट्रीय पातळीवर गौरव मिळाला. पुण्यातील SCERT येथील विभाग प्रमुख योगेश सोनवणे यांच्या 'गडाधन', शेवगाव येथील उमेश घेवरीकर यांच्या 'गुरूदक्षिणा' फिल्म तसेच नाशिक येथील करण सुनार याच्या 'अ ग्रीनर फ्युचर' या व्हिडिओला प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे, लांडेवाडी, पुणे येथील अविना शिंदे हिला ‘बेस्ट ऍक्टर' हा प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
या पुरस्कार सोहळ्याने महाराष्ट्रातील नव्या पिढीच्या सृजनशीलतेला आणि कलाक्षेत्रातील योगदानाला मोठी दाद मिळाली आहे. उत्तम कथानक, संवेदनशील दिग्दर्शन आणि प्रभावी अभिनयामुळे या विजेत्यांनी राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा झेंडा उंचावला आहे. संतोष केंद्रे आणि अन्य विजेत्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.