कळंब (प्रतिनिधी)- तालुक्यातील उमरा-परतापुर येथील तक्रारदार संजय जाधव यांनी सरपंच वंदना जाधव यांचे विरुध्द जिल्हाधिकारी, धाराशिव यांचेकडे सरपंच वंदना जाधव यांचे सासरे यांनी शासकीय जागेवरती अतीक्रमण केले बाबत तक्रार दाखल केली होती, तरी संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने सरपंच वंदना जाधव यांना अपात्र ठरविण्यात यावे याबाबत विनंती केली होती. सदरील तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, धाराशिव यांनी चौकशी व घटनास्थळ पंचनामा करण्याकरिता तहसिलदार, कळंब, गट विकास अधिकारी, उपआधिक्षक भुमिअभिलेख यांची समिती गठीत करण्याबाबत आदेश दिले होते, तरी जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या आदेशाप्रमाणे गटविकास अधिकारी व उपाधिक्षक भुमिअभिलेख यांनी चौकशी अहवाल तयार करुन जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे दाखल केला. सदरील अहवालामध्ये त्यांनी असे नमुद केले की, सरपंच वंदना जाधव यांचे सासरे यांनी विवादीत शासकीय जागेत अतिक्रमण केले असून सरपंच वंदना जाधव व त्यांचे सासरे हे एकत्र कुटूंबामध्ये राहतात त्यामुळे त्या अपात्र ठरण्यास क्रमप्राप्त आहेत, तहसिलदार कळंब, गटविकास अधिकारी आणी उपाधिक्षक भुमिअभिलेख यांनी दाखल केलेला चौकशी अहवाल व इतर पुराव्यांच्या आधारे जिल्हाधिकारी धाराशिव यांनी सरपंच वंदना जाधव यांना अपात्र केले,
जिल्हाधिकारी धाराशिव यांनी अपात्र केले बाबत सरपंच वंदना जाधव यांनी विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर येथे अपील दाखल केले तरी सदरील अपीलामध्ये विभागीय आयुक्त यांनी जिल्हाधिकारी धाराशिव यांना अतिक्रमणाच्या मुद्याबाबत फेर चौकशीचे आदेश दिले आहेत.
तक्रारदार संजय जाधव यांनी मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे ॲड. योगेश पाटील यांचे मार्फत रिट याचिका दाखल केली होती, तरी, सदरील याचिकेच्या माध्यमातून तक्रार संजय जाधव यांनी मा. उच्च न्यायालयास विनंती केली होती की, सरपंच अपात्रता प्रकरणी प्रलंबीत असलेली याचिका तात्काळ निकाली काढण्या संदर्भात विभागीय आयुक्त यांना आदेश देण्यात यावेत त्यासंदर्भात मा. उच्च न्यायालयाने याचिकाकर्ते यांचा युक्तीवाद गृहित धरुन सदरील याचिका 3 महिन्यात निकाली काढण्या संदर्भात विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांना आदेश दिले आहेत. तरी, याचिकाकर्ते संजय जाधव यांचेकडून ॲड. योगेश पाटील यांनी उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ औरंगाबाद येथे युक्तिवाद केला.