धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर व रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय नवोदित लेखक कार्यशाळा 1 मार्च रोजी संपन्न झाली. उद्घाटन समारंभ प्रसंगी शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलनाने कार्यशाळेचे उद्घाटन झाले.
उद्घाटक म्हणून बोलताना श्रीमती सुशिलादेवी साळुंखे अध्यापक महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. प्रकाश कांबळे यांनी लेखन निर्मितीत अनुभवाची निवड करणे कसे महत्त्वाचे आहे ते सांगून लेखनात सातत्य ठेवणे कसे गरजेचे आहे ते स्पष्ट केले. अध्यक्षीय समारोपातून प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी अशा कार्यशाळेतून मराठीतील अनेक लेखक कसे घडले ते सांगून लेखनामध्ये जागृती करण्याची ताकत असल्याचे त्यांनी सांगितले. पहिले सत्र मराठी साहित्य लेखन आणि सर्जनशीलता या विषयावर झाले. सत्रात मार्गदर्शन करताना जेष्ठ साहित्यिक राजेंद्र अत्रे यांनी लेखन प्रक्रिया आणि सर्जनशीलता याविषयी सखोल मार्गदर्शन केले. दुसरे सत्र मराठी व दख्खनी कविता लेखन तंत्र व स्वरूप या विषयावर संपन्न झाले. या सत्रात सुप्रसिद्ध कवी डी के शेख यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
तिसरे सत्र मराठी गझल लेखन तंत्र व स्वरूप या विषयावर संपन्न झाले. या विषयावर सुप्रसिद्ध कवी तथा पत्रकार रवींद्र केसकर यांनी अत्यंत ओघवत्या शैलीमध्ये मार्गदर्शन केले. याप्रसंगी कार्यशाळेत सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक तथा मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिवाजी गायकवाड यांनी केले. आभार प्रा. राजा जगताप व प्रा. सुवर्णा गेंगजे यांनी मानले. तर सूत्रसंचालन प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर व प्रा. डॉ. वैशाली बोबडे यांनी केले. कार्यशाळेला महाविद्यालयातील गुरुदेव कार्यकर्ते तसेच विद्यार्थी -विद्यार्थीनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. तसेच शहरातील साहित्यिक व नवोदित लेखकही या कार्यशाळेसाठी सहभागी झाले होते.