धाराशिव(प्रतिनिधी)-तुळजापूर येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) सुरू झाल्यामुळे पक्षकारांना भूसंपादन व कौटुंबिक न्यायालयीन प्रकरणांसाठी धाराशिव जिल्हा न्यायालयात जाण्याची गरज राहिलेली नाही.या नव्या न्यायालयामुळे स्थानिक व तालुक्यातील नागरिकांना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे,असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांनी केले.

१६ फेब्रुवारी रोजी तुळजापूर येथील दिवाणी न्यायालय परिसरात या वरिष्ठ स्तर न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी न्यायमूर्ती अरुण पेडणेकर प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.राजेश गुप्ता होते. तसेच,तुळजापूरचे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) श्रीमती स्वाती अवसेकर आणि तुळजापूर विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय घोडके प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी बोलताना न्यायमूर्ती पेडणेकर म्हणाले की,या न्यायालयात भूसंपादन प्रकरणे हाताळली जाणार असून,प्रसंग व पुरावे महत्त्वाचे असतील.त्यामुळे विधिज्ञांना अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागणार आहे.तसेच, कौटुंबिक न्यायालयीन प्रकरणांची जबाबदारीदेखील मोठी आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी विधिज्ञांना विशेष प्रयत्न करावे लागतील.गेल्या २० वर्षांपासून या वरिष्ठ स्तर न्यायालयाच्या स्थापनेसाठी पाठपुरावा करण्यात आला होता,असेही त्यांनी नमूद केले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना न्यायमूर्ती गुप्ता यांनी सांगितले की, मागील २० वर्षांपासून वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाची मागणी होती आणि ती आता पूर्ण झाली आहे. पालक न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांच्या मार्गदर्शनामुळेच हे न्यायालय सुरू होऊ शकले.तुळजापूर विधीज्ञ मंडळानेही वेळोवेळी यासाठी पुढाकार घेतला,असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात आई तुळजाभवानी देवी आणि भारतीय संविधानाच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.त्यानंतर न्या. अरुण पेडणेकर यांच्या हस्ते फीत कापून न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्ह्यातील आठही तालुका विधीज्ञ मंडळ,शासकीय अभियोक्ता,न्यायालय लघुलेखन संघटना,न्यायालयीन कर्मचारी पतसंस्था तसेच विधीज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुळजापूर विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय घोडके यांनी केले.संजय मैदर्गी यांनी सूत्रसंचालन केले,तर न्यायमूर्ती मिलिंद निकम यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

 
Top