धाराशिव (प्रतिनिधी)-  लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी विविध विषयांवर सरकारच्या धोरणांवर कठोर शब्दांत टीका केली. त्यांनी विशेषतः शेती, विमा, रेल्वे आणि आरोग्य क्षेत्रातील समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले. खासदार राजेनिंबाळकर यांनी संसदेत बोलताना नाफेड अंतर्गत धाराशिव लोकसभा मतदारसंघातील 44,013 शेतकऱ्यांनी नोंदणी केली असली तरी केवळ 15,798 शेतकऱ्यांकडूनच सोयाबीन खरेदी करण्यात आल्याचे स्पष्ट केले. उर्वरित 28,000 शेतकरी अजूनही वंचित असून शेतकऱ्यांचे शेवटचे पोते विक्री होईपर्यंत खरेदीस मुदतवाढ देण्याची मागणी त्यांनी केली.

महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाने सोयाबीनसाठी 7,000 रुपये प्रति क्विंटल दर सुचवला असतानाही केंद्राने केवळ 4,892 रुपये प्रति क्विंटल दर जाहीर केला आहे. हे स्पष्ट करत निंबाळकर यांनी सरकारला आक्रमक शब्दांत जाब विचारला. “2016 मध्ये सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात उत्पन्न दुप्पट होण्याऐवजी उत्पादन खर्चच दुपटीने वाढला आहे अशी टीका त्यांनी केली.


विमा कंपनीस 5 हजार कोटीचा नफा

प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत केंद्र, राज्य आणि शेतकरी मिळून 42,000 कोटी रुपये विमा प्रीमियम भरले असतानाही केवळ 36,000 कोटी रुपयेच शेतकऱ्यांना भरपाई म्हणून मिळाले आहेत. 5,000 कोटी रुपयांचा नफा खाजगी विमा कंपन्यांनी कमावला. याकडे लक्ष वेधत, ही रक्कम कंपन्यांना न देता थेट शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली. राजेनिंबाळकर यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नदीजोड प्रकल्पासंदर्भात कोणतीही तरतूद या अर्थसंकल्पात नसल्याचे सांगितले. पुरग्रस्त भागांतील पाणी दुष्काळी भागात वळवण्याची योजना सरकारने का पुढे नेली नाही? असा सवाल करत, हा प्रकल्प तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी केली.



धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे प्रकल्पाची घोषणा 2014 मध्ये प्रधानमंत्री मोदी यांनी केली होती. या प्रकल्पास 904 कोटी रूपयाच्या खर्चास प्रशासकीय मान्यता 2019 मध्ये दिली होती. 2019 ते 2024 पर्यंत खर्च वाढून 1026 कोटी रूपयांची तरतूद केली होती.  त्यानंतर यात पुन्हा वाढ होवून 3 हजार कोटी रूपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या अर्थसंकल्पामध्ये 1 हजार कोटींची तरतुद करणे आवश्यक असताना फक्त 225 कोटी रूपयांची तरतुद या अर्थसंकल्पात केल्यामुळे या मार्गाला गती कशी येणार असा प्रश्न ओमराजेनिंबाळकर यांनी उपस्थित केला.


 
Top