धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर येथे स्थित श्री तुळजाभवानी मंदिर,हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिराचे जतन व संवर्धन करून त्याला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि भाविकांच्या सोयीसुविधांसाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
राज्य मंत्रीमंडळाच्या छत्रपती संभाजीनगर येथे 16 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या विशेष बैठकीत श्री तुळजाभवानी मंदिराच्या विकासासाठी विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे.मंदिर परिसरातील असंयुक्तीक बांधकाम हटवून मंदिराला पूर्वीचे वैभवशाली स्वरूप देण्याच्या दृष्टीने हे पावले उचलण्यात आली आहेत.भाविकांच्या सोईसाठी दर्शन व्यवस्था सुधारण्याबरोबरच गर्दी नियंत्रणासाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
संरचनात्मक लेखापरीक्षण व वैज्ञानिक चाचण्या करण्यात आल्या आहे.मंदिराच्या स्थायित्वाचा आणि मजबुतीकरणाचा तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी संरचनात्मक लेखापरीक्षण करण्यात आले आहे.हे लेखापरीक्षण विशेषज्ञ व्यक्तींकडून आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात आले आहे. यामध्ये पुढील बाबी आढळून आल्या. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातील आणि सभामंडपातील दगडी बीम, स्तंभ व कर्णशिळांमध्ये तडे आढळून आले. 1993 च्या भूकंपानंतर मंदिराच्या शिखराचे बळकटीकरण करण्यात आले होते. मात्र,त्या दुरुस्तीमुळे शिखरावर अतिरिक्त भार येऊन मूळ दगडी रचनेत तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे.
बोरोस्कोपी चाचणीतून मंदिरात वापरण्यात आलेल्या वेगवेगळ्या बांधकाम साहित्यांची तपासणी करण्यात येणार आहे. क्ष-किरण तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्भगृह आणि शिखराच्या आतल्या भागातील लपलेले तडे आणि नुकसान समोर येणार आहे. तंत्रज्ञानाद्वारे मंदिराच्या पाया आणि भूगर्भातील स्थिरतेची तपासणी करण्यात येणार आहे. तिन्ही चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्याचे व शिखराचे पूर्णपणे दुरुस्ती करावी का, याचा निर्णय प्रशासनाच्या सहमतीने घेतला जाणार आहे. त्यानुसार नव्याने अंदाजपत्रक तयार केले जाईल. याशिवाय मुख्य प्रवेशद्वाराचे संरचनात्मक लेखापरीक्षण पुणे संस्थेच्या सहाय्याने केले जात असून,त्यानुसार पुढील काम हाती घेतले जाईल. अशी माहिती पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालक श्रीमती जया वाहने यांनी दिली.