धाराशिव (प्रतिनिधी)- प्रधानमंत्री मोदींजींच्या नेतृत्वाखालील सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पाचा भर प्रामुख्याने शेती, रोजगार निर्मिती, कौशल्य विकास, एमएसएमई आणि मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा आहे.सर्वसामान्य नोकरदार आणि मध्यमवर्गीयांच्यादृष्टीने मोठा निर्णय जाहीर केला आहे त्यानुसार आता नोकरदारांना 12 लाख रुपयांच्या उत्पन्नावर कुठलाही कर भरावा लागणार नाही.रोजगार आणि कौशल्यासाठी मोदींजींच्या संकल्पनेतील पाच योजनांचे प्रभावी पॅकेज यानिमित्ताने अंमलात येणार आहे. आगामी 5 वर्षांच्या कालावधीत देशातील 4 कोटी तरुणांना कौशल्यविकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी 5 नवीन योजना राबविण्यात येणार आहेत व त्यासाठी 2 लाख कोटी रुपयांची महत्वपूर्ण तरतूद करण्यात आली आहे. हे प्रशिक्षण विविध उद्योग, तंत्रज्ञान, आणि व्यावसायिक क्षेत्रातील युवकांना व महिलांना सक्षम करण्यासाठी असणार आहे. यामुळे अनेकांना प्रगतीबरोबरच नव्या संधींचा लाभ घेता येणार आहे.
छोट्या व मध्यम उद्योगांसाठी व नवउद्योजकांसाठी नवीन क्रेडिट व्यवस्था राबवण्यात येणार आहे. रोजगारावर आधारित विकासासाठी पर्यटनात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाणार आहे. देशातील प्रमुख 50 पर्यटन स्थळांना राज्य सरकारच्या सहभागाने चॅलेंज मोडद्वारे विकसित केले जाणार आहे. महिलांना स्टार्टअप्स सुरू करण्यासाठी 2 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. तसेच, अनुसूचित जाती आणि जमातीच्या महिला उद्योजकांसाठी विशेष कर्ज योजना देखील प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे, ज्यामुळे या घटकांना देखील त्यांच्या व्यवसायात अधिक प्रगती करण्याची संधी मिळेल.