धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत आयोजित सरस प्रदर्शनाकडे प्रशासक राज यंत्रणेच्या अनास्थेपोटी ग्राहकांनी पाठ फिरवण्याचे दिसून आले आहे. या प्रदर्शनासाठी लाखो रुपयांचा होणारा खर्च पाण्यात गेल्याचे दिसते आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, ग्रामीण भागातील महिला बचत गटामार्फत उत्पादित पदार्थ विक्री करिता उमेदच्या माध्यमातून सरस-जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शन गुरुवार 6 सुरू झालेले आहे. धाराशिव शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशाला मैदानावर हे प्रदर्शन सुरु आहे. या जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शनात 160 स्वयंसहायता समूहांनी सहभाग घेतला असून यामध्ये 22 समूहांचे खाद्यपदार्थाचे स्टॉल आहे. लातूर, बीड, जालना, सोलापूर, बुलढाणा व पुणे येथील 10 समूहांनी देखील सहभाग नोंदवला आहे. महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू, साहित्य व खाद्यपदार्थाचे स्टॉल याठिकाणी लावण्यात आले आहेत.
या विक्री व प्रदर्शनाबाबत संबंधित विभागाकडून प्रसिध्दीदेखील न केल्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे येथील काही महिला व्यवसायीक यांनी प्रत्यक्ष सांगितले. दूरवरुन खर्च करुन आलेल्या या महिलांचा विक्रीतून किमान खर्चतरी निघेल का? अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या महिलांचा एकप्रकारे हिरमोड झाल्याचे महिलांच्या बोलण्यातून दिसून आले.
महिलांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून बनवलेल्या वस्तूंची विक्री व्हावी, अशी अपेक्षा या प्रदर्शनातून अपेक्षीत आहे, त्यासाठी हे प्रदर्शन मांडण्यात आले. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा, होणारा खर्च हा निश्चितच मोठा आहे. त्या खर्चापेक्षाही महिलांचे साहित्य विक्री मोठ्या प्रमाणात झाले तर शासनाचा झालेला खर्च मार्गी लागला असे म्हणता येईल, परंतू धाराशिव या ठिकाणच्या विक्री प्रदर्शनासाठी झालेल्या खर्चापेक्षा महिलांच्या वस्तू विक्रीची उलाढाल यापेक्षाही कमीच राहिल, अशी परिस्थिती सध्या याठिकाणी असल्याचे दिसून येत आहे.
आयोजकांकडून विक्री प्रदर्शनाची आवश्यक असणारे प्रसिद्धी न झाल्याने ग्राहकांनी प्रदर्शनाकडे पाठ फिरवल्याचे दिसते आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. घोष यांनी या विक्री व प्रदर्शनातून 20 लक्ष रुपयांच्या वस्तू व साहित्याची विक्री अपेक्षित असल्याचे सांगितले आहे. प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती अत्यंत दयनीय आहे. त्यांचे हे उद्दिष्ट कितपत पुर्ण होणार हा प्रश्न आहे. सध्या मात्र या विक्री व प्रदर्शनातून महिलांचा एकप्रकारे हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे.