धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांची भेट घेतली व निवेदनाद्वारे 2005 पूर्वी जाहिरात निघालेल्या पण 2005 नंतर नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णयाप्रमाणे जुनी पेन्शन लागू करावी. अशी मागणी केली.
जिल्ह्यातील व पर जिल्ह्यातून बदलून धाराशिव जिल्ह्यात बदली करून आलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव गेल्या दोन महिन्यापासून शिक्षण विभागात पडून असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास शिष्टमंडळाने आणून दिले. लागलीच तात्काळ उद्याच या संदर्भात बैठक लावून माझ्या अधीकारातील प्रकरणाची छाननी करून फेब्रुवारी 2025 अखेर सर्व पात्र शिक्षक व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचे आदेश निर्गमित करतो. असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण संघाच्या शिष्ट मंडळास दिले.
तसेच छाननी करून राहिलेल्या सर्व पात्र कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव शासनाकडे मार्गदर्शनासाठी पाठवून शासनाचे मार्गदर्शन आल्यावर उर्वरित सर्व पात्र कर्मच्याऱ्यांना जुनि पेन्शनचा लाभ देणार असे सांगितले. यावेळी पात्र कर्मचाऱ्यांना निवडश्रेणी श्रेणी, व वैद्यकीय प्रतिपूर्तीचे सर्व देयक मार्च पूर्वी काढणार असेही सांगितले. शिष्टमंडळात शिक्षक नेते बशीर तांबोळी, कळंब तालुकाध्यक्ष महेंद्र रणदिवे, धाराशिव तालुकाध्यक्ष नागनाथ मुडबे, जुनी पेन्शन अध्यक्ष सचिन भांडे,सचिन मते, उपाध्यक्ष शिवाजी साखरे, पी. बी. बनसोडे, सतीश जाधवर, बी. बी.अकोसकर, चांदणे, प्रशांत कोळी यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.