मुरुम  (प्रतिनिधी) -सामाजिक प्रश्नांच्या मुळापर्यंत जावून  उत्तरे शाधायची असतील तर वैचारिक वादविवाद आवश्यक आहे असे प्रतिपादन भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. अमोल मोरे यांनी केले. ते काल श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात भारत शिक्षण संस्थेचे संस्थापक चिटणीस शिक्षणमहर्षी तात्यारावजी मोरे यांच्या स्मरणार्थ आयोजित शिक्षणमहर्षी तात्यारावजी मोरे आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय अस्वले होते. या प्रसंगी मा. पद्माकररावजी हराळकर, डॉ. सुभाष वाघमोडे,  मा. अशोकराव पाटील, मा. रामराव इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती.

निजामी राजवटीमध्ये मराठवाड्यातील ग्रामीण भागात शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणारे शिक्षणमहर्षी तात्यारावजी मोरे यांच्या शैक्षणिक कार्याला उजाळा मिळावा आणि  विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व आणि नेतृत्व गुण विकसित व्हावेत यासाठी विविध सामाजिक विषयावर विचारमंथन घडवून आणण्याच्या हेतूने या आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन केले जाते.

यावर्षीच्या चाळिसाव्या वर्षातील स्पर्धेसाठी "वर्गातील वाढती अनुपस्थिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला मारक आहे/नाही" या ज्वलंत विषयावर आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत सोलापूर, धाराशिव, लातूर आणि बीड या चार जिल्ह्यातील संघांनी आपला सहभाग नोंदविला.

या स्पर्धेत बलसुर येथील श्री छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या खुडे दिव्या व कोकाटे यशोदा यांच्या संघाने प्रथम पारितोषिक रुपये दहा हजार एक,  स्मृती चिन्ह व प्रमाणपत्र तर लोहारा येथील भानुदासराव चव्हाण वरिष्ठ महाविद्यालयातील बादुले सानिका व गिल्डा संजीवनी यांच्या संघाने सांघिक द्वितीय पारितोषिक रुपये सात हजार एक व प्रमाणपत्र पटकाविले.  तर निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या वाडकर गीता यांना वैयक्तिक तीन हजार रुपयाचे उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. अमोल भैय्या मोरे, सहचिटणीस डॉ. सुभाष वाघमोडे, प्राचार्य डॉ. संजय अस्वले यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.  स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. सुधीर मठपती, डॉ. रवींद्र आळंगे, प्रा. परमेश्वर सूर्यवंशी आणि डॉ. सुभाष इंगळे यांनी काम पाहिले. 

याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, डॉ. पद्माकर पिटले, प्रभारी प्राध्यापक वसंत हिस्सल, उपप्राचार्य जी. एस. मोरे, पर्यवेक्षक शैलेश महामुनी, संयोजन समितीचे प्रमुख डॉ. विनोद देवरकर, डॉ. चंद्रसेन करे, डॉ. सन्मुख मुच्छट्टे, डॉ. व्ही. एम. गायकवाड, प्रा. अनंत कसगीकर, प्रा. शेखर दाडगे, प्रा.महेश माकणिकर, प्रा. एम. डी. साळुंके, डॉ. प्रवीण जवळगेकर, प्रा. बी. व्ही. मोरे, आणि प्रा. एस बी कल्हाळीकर महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रदीप पाटील यांनी तर डॉ. विनोद देवरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 
Top