धाराशिव (प्रतिनिधी)- लातूर विभागीय केंद्राच्या धर्तीवर धाराशिव शहरात चार एकरावर सारथीचे भव्य सारथी भवन नियोजित आहे. यात प्रशिक्षण केंद्र, सुसज्ज प्रशासकीय इमारत,मुलं आणि मुलींसाठी प्रशस्त वसतीगृह, अत्याधुनिक अभ्यासिका यासह भव्य ऑडीटोरियमचाही समावेश असणार आहे.आनंदनगर भागातील पशुसंवर्धन विभागाची जागा 'सारथी'कडे वर्ग करण्याबाबत शासनाला प्रस्ताव पाठवण्याची सूचना आपण जिल्हाधिकाऱ्यांना केली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

धाराशिव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या 11 एकर जागेची पाहणी केली.यातील पोल्ट्री साठी एकेकाळी वापरात असलेली परंतु आता वापरात नसलेली 4 एकर जागा लातूर येथील विभागीय केंद्राप्रमाणे भव्य आणि अद्ययावत सोयी सुविधांनी युक्त असे सारथी भवन साकारण्यासाठी तसेच मुलींच्या वसतिगृहासाठी सुरक्षित व  योग्य असल्याचे लक्षात आल्याने निश्चित करण्यात आली असल्याची आ.पाटील यांनी माहिती दिली.

मराठा समाजातील विद्यार्थी आणि युवा पिढीच्या सर्वांगीण प्रगतीसह, आर्थिक उन्नतीसाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे अर्थात सारथीची स्थापना करण्यात आली आहे. विविध पद्धतीने सारथीमार्फत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसोबतच समाजातील सर्व घटकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी व्यापक स्वरुपात उपक्रम आणि विविध योजना राबवण्यात येत आहेत. धाराशिव जिल्ह्यातील मराठा समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थी आणि युवकांना त्याचा लाभ मिळावा यासाठी हे केंद्र उभारण्यास आपल्या महायुती सरकारने अनुमती दिली असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

लातूर विभागीय केंद्राच्या धर्तीवर अगदी त्याच पद्धतीने आपल्या धाराशिव शहरात अद्ययावत आशा सर्व बाबींचा अंतर्भाव असलेले सुसज्ज असे सारथी भवन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुरुवातीला 1 एकर जागा घेण्याबाबत चर्चा चालू होती. मात्र सारथीचे व्यवस्थापकीय संचालक श्री.अशोक काकडे यांच्या सोबत झालेले चर्चेच्या अनुषंगाने  धाराशिव येथे सारथी भवन उभारण्यासाठी  4 एकर जागा आवश्यक असल्याने आनंदनगर येथे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या 4 एकर जागेची पाहणी केली. मराठा समाज बांधवांसाठी महायुती सरकारने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयानुसार एक सुसज्ज सारथी भवन उभारण्यासाठी ही जागा सर्वार्थाने अनुकूल असून जिल्ह्यातील मराठा विद्यार्थी आणि युवकांसाठी अगदी मध्यवर्ती भागात असलेली ही जागा अत्यंत सोयीची असल्याने लवकरच जागा सारथीला मिळावी यासाठी प्रक्रिया राबविण्यात येईल असेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी तहसीलदार मृणाल जाधव,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ यतीराज पुजारी, उपअभियंता मोरे, मराठा समाजाचे युवक कार्यकर्ते, सुनील काकडे, अमित शिंदे,राजसिंहा राजेनिंबाळकर,अभय इंगळे,अक्षय ढोबळे,अमोल राजेनिंबाळकर,संदीप इंगळे,खंडू राऊत,रमण जाधवआदी उपस्थित होते


जागेचा प्रस्ताव दाखल करण्याची जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

धाराशिव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पशुसंवर्धन विभागाची जागा आहे. सुसज्ज आणि भव्य आशा विभागीय सारथी भवनसाठी आवश्यक असलेली सलग 4 एकर जागा याठिकाणी उपलब्ध आहे. ती जागा सारथींला देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे तातडीने पाठवावा असे निर्देश त्यांना दिले आहेत.यासाठी रु.150 कोटी खर्च अपेक्षित आहे.या कामासाठी जवळपास 4 लाख वर्गफुट जागा लागणार असून सदर काम टप्पे पाडून  करण्यात येणार आहे.याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे सादर झाल्यावर आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व  उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन खात्याचे मंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करून धाराशिव जिल्ह्यातील मराठा समाजातील विद्यार्थी आणि युवकांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेला हा विषय तातडीने मार्गी लावणार असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.


 
Top