धाराशिव (प्रतिनिधी)- येत्या काळात धाराशिव जिल्ह्यात अपारंपारिक ऊर्जा, टेक्निकल टेक्स्टाईल उत्पादन, कृषिपुरक उद्योग त्यासोबतच पर्यटन वाढीला मोठा वाव मिळणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळही लागणार आहे. जिल्ह्यातील होतकरू आणि गरजू तरुणांना जिल्ह्यासह राज्य आणि देशात सहज रोजगार मिळावेत यासाठी तुळजापूर येथे कौशल्य विद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे येथील जगप्रसिद्ध सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यवसायिक विद्यपीठाच्या सहकार्याने यासह पुढील महिनाभरात जावा सारखे महत्वपूर्ण आणि अल्पमुदतीचे, रोजगाराभिमुख कौशल्य विकास अभ्यासक्रम तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू केले जाणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
धाराशिव जिल्ह्यात महायुती सरकारच्या माध्यमातून तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या सहकार्याने अनेक महत्वाचे प्रकल्प मोठ्या गतीने पुढे जात आहेत. विविध योजना,प्रकल्प, उद्योग आणि पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्यात 35 हजार रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आपण डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यानुसार पुढील एक-दोन वर्षात आपल्याला मोठे कुशल मनुष्यबळ लागणार आहे.या अनुषंगाने स्थानिक युवकांना आधुनिक, एकात्मिक आणि व्यापक असे कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन कौशल्यधारीत शिक्षणाद्वारे रोजगारक्षम बनवण्यासाठी तुळजापुरात कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्याची संकल्पना आपण मांडली असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
तुळजापूर येथे कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याचा अनुषंगाने पुणे येथील जगप्रसिद्ध सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यवसायिक विद्यपीठचा नुकताच दौरा केला. विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. स्वाती मुझुमदार यांच्याकडून सिम्बायोसिसमार्फत चालविल्या जात असलेल्या कौशल्य विद्यापीठाची माहिती जाणून घेतली. या कौशल्य विद्यापीठात कोणते अभ्यासक्रम आहेत, त्यांच्या उपक्रमांची रूपरेषा काय याची विस्तृत सादरीकरण सिम्बायोसिसच्यावतीने करण्यात आले व तुळजाभवानी कौशल्य विद्यापीठाचा मास्टरप्लॅन करण्याचे ठरले असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.