धाराशिव (प्रतिनिधी) - धाराशिव शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी सिग्नल पॉईंट निश्चित करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी खास वाहतूक पोलिसांची नियुक्ती केलेली आहे. ज्या कामासाठी व उद्देशांसाठी पोलिसांची नेमणूक केलेली आहे. ते कर्मचारी त्या ठिकाणी न थांबता परिसरात असलेल्या पान टपरी चहा टपरी व इतर विरंगुळा करीत आहेत. त्यामुळे वाहतुकीचे तीन तेरा वाजले असून छोट्या मोठ्या अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. या पोलिसांवर अधिकाऱ्यांचा वचक राहिला आहे की नाही ? असा प्रश्न नागरिक करीत आहे.
धाराशिव शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक, बस स्थानक, देशपांडे स्टँड, बार्शी नाका, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तसेच गरजेनुसार इतर ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्यात येतात. शहरातील वर्दळ असलेल्या ठिकाणी वाहने व्यवस्थित व सुरळीत चालविल्यास वाहतूक नियंत्रण कुठल्याही प्रकारचा काम पडत नाही. मात्र चार चाकी, तीन चाकी व दोन चाकी वाहन चालक आपल्या तब्यातील वाहने विरुद्ध दिशेने अतिवेगाने चालविता. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. त्याच प्रमाणे काही बुलेट चालक रात्री अपरात्री फटाक्यांचा आवाज काढीत बुलेट चालवतात. तर बऱ्याच मोटार सायकलचे नंबर फॅन्शी असल्याचे दिसून असनूही पोलिस काही कारवाई करत नाहीत. त्याचा त्रास इतर वाहन चालकासह नागरिकांना विनाकारण सहन करावा लागतो. बेशिस्त वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर तात्काळ वाहतूक शाखेचे पोलीस योग्य ती कारवाई करीत नाही. कारण एखादा विशिष्ट वाहन चालविणारा व्यक्ती त्यांच्या ओळखीचा तरी असतो किंवा त्या वाहतूक पोलिसाला संबंधित व्यक्ती रस्त्याच्या बाजूला घेऊन गुप्तगु हस्तांदोलन करतात. त्यामुळे त्या वाहन चालकाचे मनोबल वाढते.