मुरूम (प्रतिनिधी)- तंत्रज्ञानाच्या काळात युवा पिढी मोबाईलच्या अति आहारी गेली आहे. या अतिरेकी वापरामुळे वाचनाकडे दुर्लक्ष झाले आहे. अलीकडे समाजमाध्यमांवर युवा पिढी मोठ्या प्रमाणात भरकटली जात आहे. या युवा पिढीला वाचनाची आवड निर्माण व्हावी. वाचन म्हणजे मनाची मशागत, वाचनाने मस्तक समृद्ध बनते, समृद्ध झालेले मस्तक तरुणांचे व्यक्तिमत्व घडवते त्यामुळे वाचन हीच विद्यार्थ्यांच्या यशाची गुरुकिल्ली असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले. 

माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात ग्रंथालय विभाग, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा व शाळा संपर्क अभियान (राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : 2020) अंतर्गत व्याख्यानाप्रसंगी सोमवारी (ता. 13) रोजी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. यावेळी प्रतिभा निकेतन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य करबसप्पा ब्याळे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समन्वयक प्रा. डॉ. सुशील मठपती, प्रा. डॉ. सुजित मटकरी, ग्रंथपाल डॉ. राजकुमार देवशेट्टे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. प्रतापसिंग राजपूत, प्रा. अशोक बावगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

पुढे बोलताना डॉ. महेश मोटे म्हणाले की, विद्यार्थ्यांना क्रमिक अभ्यासक्रमासोबत अवांतर वाचन करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारच्या  शिक्षण विभागाने आनंददायी वाचन चळवळ सुरू करण्याचा उद्देशाने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी, भाषा कौशल्यांचा विकास, तर्कशक्ती व  सर्जनशीलता वाढविणे, तणावमुक्त शिक्षण, सांस्कृतिक व सामाजिक मूल्यांची जोपासना आदी उद्देश डोळ्यासमोर ठेवून या उपक्रमाचे महाराष्ट्रभर आयोजन करण्यात येत असल्याचे शेवटी ते म्हणाले. 

प्रा. डॉ. सुशील मठपती म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुण, तंत्र कौशल्यांच्या विकासासोबतच त्यांचा गुणात्मक दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमाची रचना करण्यात आलेली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना विषय निवडण्याचे स्वातंत्र्य, स्वायत्तता, आनंददायी शिक्षण व स्वतःच्या आवडीनिवडीनुसार शिक्षण घेण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे. अध्यक्षीय समारोपप्रसंगी डॉ. अशोक सपाटे की, विद्यार्थ्यांनी नियमित वाचनाची सवय लावून अवांतर वाचनाचा संकल्प करावा. नितीन कंटेकुरे,  विजयालक्ष्मी भालेराव, प्रा. अजिंक्य राठोड आदींनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सुजित मटकरी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार प्रा. डॉ. प्रतापसिंग राजपूत यांनी मानले. यावेळी या कार्यक्रमास विविध शाखेचे बहुसंख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.   


 
Top