धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भोवती असलेले वाईन शॉप व बीअर बार इतरत्र हटवून छत्रपती शिवाजी महाराज चौक अतिक्रमणमुक्त करण्यात यावा अशी मागणी बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. मागणीची दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना संघटनेमार्फत मंगळवारी (दि.7) देण्यात आले.

निवेदनात म्हटले की, महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील अठरापगड जातींचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्यदिव्य अश्वारूढ पुतळा धाराशिव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उभारण्यात आलेला आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी रामानंद तिवारी यांच्या कार्यकालात सन 1983 सालात उभारण्यात आलेल्या या पुतळ्यामुळे धाराशिव शहराच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर पडली. परंतु सध्या हा पुतळा वाईन शॉप आणि तळीरामांच्या विळख्यात अडकला आहे.

पुतळ्याच्या पूर्वेस एक वाईन शॉप आणि एक बीअर बार तर पश्चिमेस आणखी एक वाईन शॉप असल्यामुळे पुतळा सतत तळीरामांचा गोंधळ, कधीकधी हाणामारीचे प्रसंग घडत आहेत. अशा घटनांमुळे वाहतुकीची कोंडी होऊन येथे नेहमीच गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. अनेकदा तर येथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील असेही बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय शिंगाडे यांनी निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर धर्मवीर कदम, गणेश वाघमारे, यु.व्ही.माने, शरद जगदाळे, अनिरुद्ध कावळे व इतर शिवप्रेमींची स्वाक्षरी आहे. 

 
Top