धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील बहुतांश भागाला यंदाच्या खरिपात पावसाने झोडपून काढले. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असलेल्या सोयाबीनच्या क्षेत्राला मोठा फटका बसला. परिणामी सोयाबीनच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट दिसून आली आहे. खरिपातील मुख्य नगदी पीक असलेल्या सोयाबीनला सर्वाधिक फटका बसल्याने शेतकरी बांधवही अडचणीत सापडले आहेत. नुकसानीची पूर्वसूचना दिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम विम्यापोटी किमान 6200 ते 6500 रूपये प्रती हेक्टरी सर्व मंडळांना मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या पावसामुळे शेतीचे आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने आर्थिक कोंडीत सापडलेल्या जिल्ह्यातील 5 लाख 49 हजार 791 शेतकऱ्यांनी खरीप हंगामात ओढवलेल्या नैसर्गिक आपत्ती दरम्यान विमा कंपनीच्या निकषानुसार झालेल्या नुकसानीच्या पुर्वसुचना नोंदवल्या होत्या. नोंदविण्यात आलेल्या एकूण 5 लाख 32 हजार 826 शेतकऱ्यांच्या पुर्वसुचना पात्र ठरल्या आहेत. पात्र ठरलेल्या या 5 लाख 32 हजार 826 पूर्वसूचनांपैकी 4 लाख 70 हजार 72 पुर्वसुचना एकट्या सोयाबीन पिकाच्या आहेत. वरील सर्व पात्र पूर्वसूचनांचा आढावा जिल्हास्तरीय समितीमध्ये घेण्यात आला आहे.
विमाकंपनीने मान्य केलेल्या या सर्व पात्र पूर्वसूचनांचा 25 टक्के अग्रीम प्रमाणे हेक्टरी रक्कम 6 हजार 200 ते 6 हजार 500 रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. लवकरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा हक्काचा 25 टक्के अग्रीम विमा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून येत्या महिन्याभरात ही रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यात एकूण 250 ते 260 कोटी रुपये जमा होतील. त्यासाठी आपला आग्रही पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.