धाराशिव  (प्रतिनिधी) - अंगणवाडी सेविका या बालकांना पिण्याचे काम तर करतातच त्याशिवाय बालकांनी वर्गामध्ये घाण केली तर ती साफसफाई करून त्या मुलांना व्यवस्थित व नीटनेटके ठेवतात. तर कधी कधी तिच्या बालकांची आई देखील असतात. त्यामुळे बालकांच्या बौद्धिक, शरीरिक, भावनिक, नैतिक व सामाजिक सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी सेविकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) च्या प्रभारी प्राचार्या डॉ अंजली सुर्यवंशी यांनी दि.18 डिसेंबर रोजी केले.

धाराशिव येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) मध्ये कैवल्य एज्युकेशन फाउंडेशन, पिरामल फाउंडेशन व जिल्हा शिक्षण विभाग धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्षमता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी डायटचे अधिव्याख्याता उमेश नरवडे, प्रदीप घुले, बाल विकास प्रकल्प अधिकारी सविता देशमुख (धाराशिव), ताई बोराडे (कळंब), यु.बी. भारती (वाशी), पर्यवेक्षिका इंदुमती राठोड, शितल गाढवे, फाउंडेशनचे व्यवस्थापक दिनेश शिमणीकर, श्रुती कापरे, धनश्री खडसे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना प्रभारी प्राचार्या डॉ सुर्यवंशी म्हणाल्या की, भारतात बाल शिक्षणाची सुरुवात गजू भाई बधेका यांनी 1918 साली मॉन्टेसरी पद्धतीचा वापर केला. तर ताराबाई मोडक यांनी योग्य अध्यापन शास्त्र, प्रयोग व अनुभव याचा आधार घेऊन बालकांना शिकविण्यास सुरुवात केली असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच राम जोशी आयोगाने 1972-73 साली मुलांना कृतीयुक्त, आनंददायी, बाल स्नेही, अनुभव व रचनात्मक शिक्षणावर भर दिला. त्यामुळे बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कृतीयुक्त शिक्षण देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी 2009 शिक्षण हक्क कायद्यामध्ये त्याचा समावेश केला. तसेच 2016 व 2020 या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये 3 ते 8 वयोगटातील बालकांच्या शिक्षणावर भर देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. अंगणवाडी सेविका या बालकांच्या मेंदूचा सर्वोत्तम विकास करण्यासाठी प्रयत्न करीत असल्यामुळेच अंगणवाडी सेविकांना त्याचे श्रेय जात आहे. त्यांच्यामुळेच आज घडीला महाराष्ट्रात 1 लाख 10 हजार 445 अंगणवाड्यांची संख्या असल्याचे डॉ सुर्यवंशी यांनी आवर्जून सांगितले. यावेळी बाल विकास प्रकल्प अधिकारी ताई बोराडे, रूपाली गायकवाड, प्रवीण गुरव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रुती कापरे यांनी तर सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार धनश्री खडसे यांनी मानले. यावेळी जिल्हाभरातील 150 प्रशिक्षणार्थी अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, कार्यकर्ती व संघटनेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top