तुळजापूर (प्रतिनिधी) -  तालुक्यातील अनेक  गावखेड्यातील रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाल्याने या दुरावस्था झालेल्या रस्ताची दखल घेतली जात नसल्याने अखेर  ग्रामस्थ वर्गणी करुन रस्ता दुरुस्ती करीत असल्याने रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या  संबंधित अभियंता विभाग प्रमुख यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना याच वर्षात ग्रामीण भागातील ग्रामस्थावर वर्गणी गोळा करुन रस्ता दुरुस्ती करावी लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागाचा विकासाचा वल्गना फोल  ठरत आहेत.

तुळजापूर  तालुक्यातील ग्रामीण भागातील खराब रस्ते  दुरुस्ती ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी बनली आहे. किरकोळ दुरुस्ती करुन लाखोची बिल,काढले जात आहेत. रस्ते दुरुस्ती काम तुकडे तुकडे काम करायाचे असे पध्दतीने केले जात आहे.

तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी येथील  ग्रामस्थांना आपला शेतमाल नेणे येजा करणारा  महत्त्वाचा  चार कि.मी.चा रस्ता हा रस्ता साधारणतः मागील काही वर्षांपूर्वी तयार केला होता. तेंव्हापासून एक ते दोन ठिकाणी वारंवार दर दोन ते तीन वर्षांनी त्याच ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती केली जाते. बाकीच्या ठिकाणी रस्त्यावरील डांबर, खडी,मुरुम निघुन जाऊन त्याठिकाणी डबकी तयार झाली तरी कोण लक्ष देत नाही. याच खराब रस्त्यावरून गंजेवाडी येथुन अनेक शेतकरी आपला शेतमाल घेऊन सोलापूर येथे जातात. शाळेचे विद्यार्थी सायकलवरून येथे ये-जा करतात. तसेच गरोदर माता, व इतर रुग्णांना तातडीने दवाखान्यात नेता येत नाही. सायकल, मोटार सायकलवरून नीट जाता येत नाही. अशी वाईट परीस्थिती नागरीकांवर आली. या खराब रस्त्यावरुन जाताना नागरीकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्येक दोन वर्षा आडा एक ते दोन ठिकाणीच वारंवार रस्ता दुरुस्त केला जातो. बाकीच्या खराब खड्डे पडलेल्या रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात असुन खराब ठिकाणचा रस्ता दुरुस्त न करता चांगल्या रस्त्याची डागडुजी करुन सहकार्याने गुत्तेदार मालामाल होत असुन नागरीकांचे मात्र हाल होत असल्याचे नागरीकांनी बोलताना सांगितले.

गंजेवाडी येथील शेतकरी, वाहनचालक यांनी दुरुस्त केला रस्ता 

गंजेवाडी हा रस्ता इतका खराब झाला की वाहने पलटी होता होता वाचली. तसेच शेतकऱ्यांचा शेतमाल घेऊन जाण्यास वाहनचालकही कोणी येईना त्यामुळे झोपलेल्या प्रशासनाची वाट न बघता गंजेवाडी येथील शेतकरी व वाहनचालकांनी वर्गणी करुन रस्त्यांवरील खड्डे बुजवून रस्ता कामा पुरत दुरुस्त केला. आज प्रत्येक शहर गाव राष्ट्रीय महामार्गाला जोडले जात असताना तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना खेडेगावातील असे अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असुन याकडे का लक्ष देत नाहीत? असा सवाल नागरिकांनामधुन उपस्थित केला जातोय.


 
Top