धाराशिव : येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. मारुती अभिमान लोंढे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
डॉ. मारुती लोंढे यांनी एकुण 32 पुस्तकांचे लेखन केलेले आहे. त्यांची वळण ही ग्रामीण कादंबरी सुप्रसिध्द आहे. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. रमेश दापके श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मराठवाडा विभाग प्रमुख तथा रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या हस्ते डॉ.लोंढे यांनी लिहीलेल्या अर्थशास्त्र विषयाच्या 31 व्या आणि 32 व्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी डॉ. रमेश दापके म्हणाले की ,महाविद्यालयाची गुणवत्ता ही प्राध्यापकाच्या एकूण शैक्षणिक कार्यावर बाहेर चर्चिली जाते किंवा ओळखली जाते. जेव्हा शिक्षक गुणवत्तापूर्ण असतो तेव्हा विद्यार्थी देखील गुणवत्तापूर्ण घडत असतो.गुणवत्ताही प्राध्यापकापूर्ती मर्यादित न राहता ती पुढच्या पिढीमध्ये जाते.त्यामुळे प्राध्यापक गुणवत्तापूर्ण असणे गरजेचे आहे.ते पुढे म्हणाले की, रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात अनेक बुद्धिमान लोक घडले ,अनेक बुद्धिमान लोक येथे येऊन गेले आणि अनेक बुद्धिमान लोकांनी या ठिकाणी काम देखील केले आहे. त्यांनी पुढील कार्यासाठी डॉ. लोंढे यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख म्हणाले की,शैक्षणिक क्षेत्रामध्ये ,संशोधनामध्ये नाविन्यपूर्ण संशोधन , लेखन करून गुरुदेव कार्यकर्त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण करणे गरजेचे आहे.भविष्यातील नवनवीन येणारी आव्हाने पेलण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे आणि त्याचा उपयोग विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी झाला पाहिजे. असे ते यावेळी म्हणाले.डॉ. लोंढे यांनी अविरतपणे लिहीत राहावे त्यांच्या लेखन कार्याला माझ्याकडून शुभेच्छा आहेत असे ते म्हणाले.
या कार्यक्रम प्रसंगी बोलताना डॉ. मारुती लोंढे म्हणाले की , माझी एकूण 32 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत त्यातील 31वे पुस्तक पुस्तक श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आणि सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान आदरणीय प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांना समर्पित करण्याचे सदभाग्य मिळाले याचे मला समाधान वाटते. प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब यांच्याकडे पाहिल्यानंतर प्रत्येक गुरुदेव कार्यकर्त्याच्या मनामध्ये नवी उमेद तयार होते ते सर्वांचे प्रेरणास्थान आहेत. 31 वे माझे पुस्तक बँका आणि सार्वजनिक अर्थकारण हे पुस्तक मी त्यांना समर्पित केलेले आहे.
विकास व नियोजनाचे अर्थशास्त्र हे 32 वे पुस्तक महाविद्यालयाचे प्रयोगशील आणि शिस्तप्रिय प्राचार्य तथा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विभागप्रमुख डॉ. जयसिंगराव देशमुख यांना समर्पित करण्याचे सदभाग्य मिळाले. प्राचार्य डॉ जयसिंगराव देशमुख यांनी शैक्षणिक प्रगती करण्यासाठी सातत्याने प्रेरणा दिली. व वेळोवेळी कौतुक केले. त्यामुळेच माझ्या लेखन कार्याची गती वाढत गेली. यावेळी डॉ.लोंढे यांनी सर्वांचे आभार मानले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.वैभव आगळे यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.