धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आपले नियोनबद्ध प्रयत्न सुरू आहेत. पर्यटन, उद्योग व शाश्वत सिंचनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यासाठी आपण एक कालबद्ध कृती कार्यक्रम आखला असून पहिल्या टप्प्यात 10000 रोजगार निर्मिती करण्याचा आपला निश्चय असून जनतेने देखील 2025 या नववर्षात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

2019 साली आपण जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्याचा क्षमता असलेले प्रमुख 5 विषय घेऊन त्यातून सर्वांगीण विकासाला चालना देणे व मोठ्या प्रमाणात  रोजगारनिर्मिती करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून आखणी केली होती. यासाठी तत्कालीन ठाकरे सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून देखील दुर्दैवाने अडीच वर्षाच्या कालावधीत याबाबत कांहीही सहकार्य मिळाले नाही. मात्र 2022 साली आलेल्या महायुती सरकारने तत्कालीन उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, टेक्निकल टेक्सटाईल पार्क, तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्ग व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यासाठी आवश्यक ते निर्णय घेत हे प्रश्न मार्गी लागावे यासाठी प्राथमिक निधीसह कामाचे नियोजन देखील केलं असल्याची माहिती आमदार पाटील यांनी दिली आहे.

35000 रोजगार निर्मितीसाठी आपण 12 महत्वाचे प्रकल्प हाती घेतले असून, तामलवाडी औद्योगिक वसाहतीत 150 मध्यम व लघु उद्योग उभारणे. श्री क्षेत्र तुळजापूर विकास आराखड्याच्या माध्यमातून धार्मिक पर्यटनाला चालना देणे. नळदुर्ग येथे पर्यटनाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करणे. होर्टी येथे औद्योगिक वसाहत उभारून रोजगारनिर्मिती करणे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प कामाच्या माध्यमातून शाश्वत सिंचन सुविधा निर्माण करणे. कौडगाव येथे देशातील पहिले स्वतंत्र टेक्निकल टेक्सटाईल पार्क उभारणे. श्रीक्षेत्र येरमाळा येथे विकास आराखडा राबवून धार्मिक पर्यटनाला चालना देणे. शिराढोण तालुका कळंब येथेऔद्योगिक वसाहत उभारणे. येडशी येथील रामलिंग तीर्थक्षेत्र व अभयारण्य विकास करून पर्यटनाला चालना देणे. सिद्धेश्वर वडगाव येथील औद्योगिक वसाहती मध्ये रोजगार निर्मिती करणे. तेर जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आणणे आदी योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती सांगितली.


सुकानू समित्या गठीत होणार

रोजगार निर्मितीच्या ‌‘लक्ष-10000' या उपक्रमात ज्यांना आपलं देखील योगदान असावं असे वाट्ते अशा व्यक्तींनी 8888627777 या क्रमांकाशी संपर्क साधावा. प्रत्येक विषयावर संबंधित क्षेत्रातील व्यक्तींचा सहभाग घेऊन 12 सुकानू समित्या गठीत केल्या जाणार आहेत. या समितीच्या माध्यमातून प्रकल्पाचा पाठपुरावा केला जाणार आहे व कालबद्ध अंमलबजावणीवर भर दिला जाणार आहे. जिल्हाधिकारी देखील दर 15 दिवसाला या विषयांचा आढावा घेतील. जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलनाऱ्या या विकास प्रक्रियेत जनतेने सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन आमदार पाटील यांनी केले आहे.

 
Top