भूम (प्रतिनिधी)- येथील ग्रामदैवत अल्लमप्रभू महोत्सवा यात्रेचा सोमवारी विविध कार्यक्रमांनी समारोप झाला. शनिवार, रविवार व सोमवारी यात्रेमुळे शहरात चैतन्याचे वातावरण होते. या कुस्तीच्या फडात विविध भागांतील नामांकित पैलवानांनी सहभाग घेतला,कुस्तीच्या दंगलीने यात्रेची सोमवारी सांगता झाली.
श्री अल्लमप्रभू ट्रस्टच्या वतीने कीर्तन, लावण्यांसह कुस्तीच्या फडला प्रचंड गर्दी होती. यात्रेत सर्व जातीधर्माचे लोक उत्साहात सहभागी झाले. श्री अल्लमप्रभू मंदिराचा मार्ग व परिसर विविधतेने फुलून गेला होता. विविध पाळणे, सर्कस, लहान मुलांचे मनोरंजनाचे उपक्रम यात्रेत दाखल झाले होते. यात्रेत ग्रामीणसह शहरातील माहेरवाशिनी हजेरी लावतात. मुबंई, पुणे, औरंगाबाद इतरत्र बाहेरगावी असलेली नोकरदार मंडळीही यात्रेत येतात. कुस्तीच्या फडावर उस्मानाबाद जिल्ह्यासह कोल्हापूर, सोलापूर, पुणे, जामखेड, नगर, बीड, लातूर जिल्ह्यातील पैलवान सहभागी झाले होते.
यावेळी भूम येथील मल्ल किरण काळदाते विरुद्ध धीरज बारस्कर या दोन्ही मल्लांची कुस्ती रंगतदार झाली. यामध्ये कुस्ती बरोबरीत सोडली. या कुस्तीसाठी आलम प्रभू ट्रस्ट च्या वतीने पारितोषिक दिले. पंच म्हणून अमोल वीर यांनी काम पाहिले. शंकर गाढवे, मामू जमादार, पोलिस उपनिरीक्षक कैलास भारती, काँग्रेस तालुका अध्यक्ष रुपेश शेंडगे, आक्त्तर जमादार, शिवलिंग शेंडगे, राजाभाऊ गवळी, बप्पा गाढवे, भोळे होते. तीन दिवस विविध रंगाच्या विविध आकाराच्या सादरीतून शोभेची दारू उडवण्यात आली. तीन दिवस मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. यात्रेसाठी पोलिस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पोलिस दल तैनात ठेवले होते.