धाराशिव (प्रतिनिधी) - हात ऊसणे घेतलेली रक्कम परत देण्यासाठी ऊसणे पैसे घेणाऱ्या व्यक्तीने दोन चेक (धनादेश) दिले. मात्र त्याच्या बँक खात्यावर पुरेशी रक्कम शिल्लक नसल्यामुळे ज्यांनी पैसे दिले त्यांची फजगत झाली. याप्रकरणी यशवंत हाजगुडे यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात विधीज्ञ ॲड.धर्मराज नवनाथ सोनवणे यांनी मांडलेली बाजू ग्राह्य धरून मुख्य 2 रे अतिरिक्त न्यायालयाचे दंडाधिकारी न्यायाधीश पी.व्ही. मेंढे यांनी आरोपी राजेश आर. श्रीखंडे यांना 6 महिन्यांचा कारावास व दुप्पट रक्कम देण्याची शिक्षा ठोठावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव शहरातील गणेश नगर येथील यशवंत सुभाष हाजगुडे यांच्याकडुन आरोपी धाराशिव तालुक्यातील सांजा येथील राजेश आर. श्रीखंडे यांनी हात ऊसणे रक्कम घेतलेली होती. ती रक्कम परत देण्यासाठी आरोपी राजेश श्रीखंडे याने फिर्यादी यशवंत हाजगुडे यांना 31 हजार 500 रुपयांचे 2 धनादेश दिले होते. परंतू ते धनादेश हे आरोपीच्या खात्यावर रक्कम नसल्यामुळे वटले नाहीत. त्यामुळे आरोपीने फिर्यादीचे पैसे दिले नसल्यामुळे फिर्यादीने धनादेश अनादरित झाल्या प्रकरणी आरोपी विरुद्ध मे. मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात निगोशिएबल इन्स्टुमेंट ॲक्ट कलम 138 नुसार दोन प्रकरणे दाखल केली होती. त्यानंतर आरोपीने एक प्रकरण तडजोडी आधारे मिटवले व फिर्यादीची रक्कम फिर्यादीला परत दिली. मात्र धनादेशाची रक्कम परत दिली नसल्यामुळे एस.सी.सी.नं. 491/2016 या प्रकरणाची सुनावणी मे. 2 रे अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायाधिश पी.व्ही. मेंढे यांच्या न्यायालयात झाली. या प्रकरणामध्ये फिर्यादी व साक्षीदार यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. मे.न्यायालयासमोर फिर्यादी यांचे विधिज्ञ ऍड.धर्मराज नवनाथ सोनवणे यांनी सदर धनादेश हा आरोपीने फिर्यादीची रक्कम परत देण्यासाठीच दिला होता, हे पुराव्यानिशी सिद्ध करीत तसा ठोस असा युक्तीवाद केला. त्यानुसार मे. 2 रे अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी आरोपी राजेश आर. श्रीखंडे यांना निगोशिएबल इन्स्टुमेंट ॲक्ट कलम 138 नुसार दोषी ठरवून श्रीखंडे या आरोपीला 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच धनादेश रकमेच्या दुप्पट दंड 63 हजार रुपये 2 महिन्यांच्या आत फिर्यादीला देण्यात यावी. कसूर केल्यास पुन्हा 3 महिने सश्रम कारावासाची शिक्षा देण्यात येते असा निकाल दि.21 डिसेंबर रोजी न्यायाधीशांनी दिला. फिर्यादीच्यावतीने ॲड.धर्मराज नवनाथ सोनवणे यांनी काम पाहिले. तर त्यांना ऍड.सचिन डी. कांबळे यांनी सहकार्य केले.