धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील मांजरा शुगर इंडस्ट्रीज प्रा. लि., कारखान्याचा दुसऱ्या गळीत हंगामाचा व बॉयलर अग्निप्रदिपनचा शुभारंभ 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:21 वा. दिपशीखा धिरज देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला.

मांजरा परिवाराचे मार्गदर्शक सहकार महर्षी व महाराष्ट्राचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मांजरा शुगर इंडस्ट्रीज कारखान्याची वाटचाल सुरू असून, कारखान्याच्या गाळप हंगाम सन 2024-25 चा दुसऱ्या गळीत हंगामाचा शुभारंभ दिपशीखा धिरज देशमुख व कार्यक्षेत्रातील शेतकरी यांच्या हस्ते मोळी पूजन करून झाला. यावेळी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी कारखान्याचे कार्यकारी संचालक पंडीत देसाई, जागृती शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीजचे जनरल मॅनेजर गणेश येवले, संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक रविशंकर बरमदे उपस्थितीत होते.

यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर सतीश वाकडे म्हणाले, कारखान्याने मागील हंगाम यशस्वीरित्या पूर्ण केला असून, चालू हंगाम सन 2024- 25 मध्ये उदिष्टाप्रमाणे गाळप होणेसाठी कारखान्याने आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. मांजरा परिवार व शेतकऱ्यांचे असलेले विश्वासाचे अतुट नाते आहे. याचा विचार करता कारखान्याकडे नोंदलेला सभासद व बिगर सभासद यांचा संपूर्ण ऊस गाळपास येणेसाठी सक्षम अशी ऊस तोड, वाहतूक यंत्रणा भरती करण्यात आली आहे. चालू गाळप हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेने चालणार असून, त्यासाठी आवश्यक ती मशिनरी दुरूस्ती व आधुनिकीकरणाची कामे करण्यात आली आहेत. कारखाना व्यवस्थापनाने कार्यक्षेत्र व भागातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचा सार्थ हेतू विचारात घेऊन कारखान्यामार्फत प्रभावीपणे राबविण्यात येत असलेल्या ऊस विकास योजनेला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कारखाना राबवित असलेल्या विविध ऊस विकास योजनेचा लाभ घ्यावा व चालू गळीत हंगामात कारखान्यास जास्तीत जास्त ऊस पुरवठा करुन सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोड, वाहतूक ठेकेदार, कारखान्याचे जनरल मॅनेजर (टेक्नीकल) अजित कदम यांच्यासह खाते प्रमुख, विभाग प्रमुख व कर्मचारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top