तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी तथा पुण्यात वास्तव्यास असलेले सेवानिवृत्त नगरपालिकेचे मुख्याधिकारी विलास विश्वनाथ ढगे यांच्या पुढाकाराने"पुण्यातील काटीकर" यांच्यासाठी शनिवार दि. 9 रोजी पुण्यातील हॉटेल अतिथ्य या ठिकाणी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात जवळपास 70 ते 80 पुण्यातील काटीकरांनी सहभाग नोंदवला होता.
गेल्या बऱ्याच वर्षांपासून काटीतील अनेकजण पुण्यातील विविध ठिकाणी व्यवसाय, नोकरीनिमित्त तसेच काहीजण वेगवेगळ्या चांगल्या पदावर कार्यरत आहेत तर काहीजण सेवानिवृत्त होऊन तेथेच स्थायिक झालेले आहेत. नगरपालिकेचे सेवानिवृत्त मुख्याधिकारी विलास ढगे व सौ.सविता विलास ढगे या दाम्पत्यांच्या संकल्पनेतून एकमेकांची ओळख निर्माण व्हावी, सुख-दु:खात एकमेकांनी एकत्रित यावे उद्देशाने"पुण्यातील काटीकर" यांच्यासाठी स्नेह मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने त्यांनी पुण्यातील काटीकरांसाठी एक व्हाट्सअप ग्रुप तयार करून त्यामाध्यमातून त्यांना निमंत्रित करून हा स्नेहमेळावा यशस्वी केला.
या आगळ्यावेगळ्या स्नेह मेळाव्यात काटीतील महिला व पुरुष मंडळींनी बालपणीच्या गावाकडच्या जीवनातील आठवणींना उजाळा देत रममाण होऊन धम्माल करीत एकत्रित स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. काटीत झालेल्या शिस्त व शैक्षणिक संस्कारामुळे काटीतील नागरिक विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. तर अनेकांनी विविध व्यवसायात आपला ठसा उमटवला असून व्यवसायात सुध्दा काटीकर कमी नाहीत हे सिद्ध करुन दाखवले आहे. आगळा-वेगळा स्नेह मेळावा आयोजित केल्याबद्दल आयोजक विलास ढगे यांचे देखील अनेकांनी ऋण व्यक्त केले. अनेक वर्षांनी लहानपणीचे मित्र-मैत्रिणी एकत्र आल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. दरवर्षी असेच एकत्र येणार असल्याचा निर्धारही उपस्थित काटीकरांनी व्यक्त केला. आपलं सामाजिक दायित्व निभावण्यासाठी एकमेकांची मदत घेत पुण्यातील काटीकरांना आधार देण्यासाठी कायम तत्पर राहण्याचा संकल्प यावेळी आयोजक विलास ढगे यांच्यासह मित्र-मैत्रिनींनी केला.
या स्नेह मेळाव्यात आयोजक नगरपालिकेचे मुख्याधिकारी विलास ढगे,दिलीप नारायणकार,राज्य ग्रामीण विकास संस्था यशदा पुणे येथील संशोधन अधिकारी नेताजी आगलावे, डॉ.अविनाश ढगे, सुदर्शन आगलावे, उद्योजक बळीराम ढगे,अनिल ढगे, जयपाल ढगे,नेताजी चिवरे,प्रवीण पांगे,पद्मजा गोरे,काशिनाथ माळी,अर्चना ढगे,नारायण ढगे सुहास कुलकर्णी,उमेश जामगांवकर, बाली सावरगावकर,सुखदेव मंडलिक, साहित्यिका उमा काळे, स्वाती माढेकर,रावसाहेब सोनावणे, रामेश्वर राऊत, राजु साळुंके,अर्चना कुलकर्णी, वनिता ढगे,लक्ष्मण काळे, सुप्रिया जांभळे,शंकर माळी,अनिता माळी आदी मान्यवर उपस्थित होते.