धाराशिव  (प्रतिनिधी)-  खरीप हंगाम 2024-25 मध्ये जिल्हयात आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडमार्फत तालुकानिहाय 17 केंद्रावर मुग,उडीद व सोयाबीन या पिकाची ऑनलाईन शेतकरी नोंदणीस 1 ऑक्टोबरपासून सुरूवात झाली आहे.शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या खरेदी केंद्रावर स्वत : जावून ऑनलाईन नोंदणी करावी.असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे. 

शेतकऱ्यांनी पिकांच्या नोंदणीसाठी आपले आधार कार्ड,राष्ट्रीयकृत बँकेचे छापील पासबुक (अकाउंट नंबर व आय.एफ.एस.सी.कोड स्पष्ट दिसावा),ऑनलाईन पीक पेरा असलेला 7/12 उतारा घेवून पिकाची नोंदणी करावी. 

शासनाकडून  मुंग,उडीद,सोयाबीन या पिकांसाठी नोंदणी कालावधी निश्चित करण्यात आला आहे.यामध्ये मुंग आणि उडीद या पिकासाठी 1 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. तर त्यांचा खरेदी कालावधी हा 10 ऑक्टोबर 2024 पासून 7 जानेवारी 2025 पर्यंत असणार आहे. तर सोयाबीन पिकासाठी 15 ऑक्टोबर 2024 पासून खरेदीस सुरुवात झाली आहे.ही खरेदी 12 जानेवारी 2025 पर्यंत नाफेडकडून करण्यात येणार आहे. 

मुग,उडीद,सोयाबीन या पिकांच्या आधारभूत किंमतीही निश्चित करण्यात आल्या आहेत.यामध्ये मुग पिकासाठी 8 हजार 682  रूपये प्रति क्विंटल,उडीद पिक 7 हजार 400  रूपये प्रति क्विंटल, सोयाबीन 4 हजार 892 रूपये प्रति क्विंटल दराने निश्चित करण्यात आला आहे.

याबरोबरच तालुकानिहाय खरेदी केंद्र आणि सबएजंट संस्थेची नेमणूकही करण्यात आली आहे.धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुका शेतकरी सह संघ लि.,धाराशिव, विकास कृषी पणन सहकारी संस्था मर्या उस्मानाबाद,वसुधरा जिल्हा कृषी पणन व प्रक्रीया सह.संस्था कनगरा,वसुंधरा अँग्रीकल्चर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लि.कनगरा, तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री संघ,ता.तुळजापूर,श्री.खंडोबा पणन सहकारी संस्था मर्या अणदूर,लोहारा तालुक्यातील जगदंबा सहकारी खरेदी विक्री संस्था लोहारा,दस्तापूर विविध सर्व सेवा सहकारी सोसायटी मर्या दस्तापूर,उमरगा तालुक्यातील गुंजोटी विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि गुंजोटी,श्री.स्वामी समर्थ सर्व सेवा सहकारी संस्था मर्या. गुंजोटी,कळंब तालुक्यातील एकत खरेदी विक्री सहकारी संस्था मर्या.धाराशिव,तालुका सह.शेतकरी खरेदी विक्री संघ लि.कळंब, राजमाता कृषी पुरक सेवा पुरवठा सहकारी संस्था,चोराखळी,वाशी तालुक्यातील वाशी तालुका शेतकरी सह संघ लि.वाशी तर भुम तालुक्यातील शिवाजी भुम तालुका शेतकरी सह.खरेदी विक्री संघ लि., तनुजा महिला शेतीपूरक सेवा पुरवठा सह संस्था सोन्नेवाडी भूम,कै. उत्तमराव सोन्ने कृषीमाल पुरक सह . संस्था सोन्नेवाडी या केंद्रावर आपले वरील पिके विकता येणार आहेत. 

शेतकऱ्यांनी शासनमान्य हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन शेतमाल घेवून येतांना व्यवस्थितरित्या वाळवून आणावा.जेणेकरून आर्द्रता मोजतांना 12 टक्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.जास्त आर्द्रतेमुळे शेतमाल परत नेण्याची वेळ येणार नाही.असेही आवाहन जिल्हा पणन अधिकारी एम.व्ही.बाजपेयी यांनी केले आहे.

 
Top