कळंब (प्रतिनिधी) दिवाळीच्या सणातच कळंब बस आगारात अधिकारी व कर्मचाऱ्यात समन्वयाचा अभाव दिसून आला. रोटेशन कॅन्सलमुळे काही कर्मचारी खुश तर काही नाराज झाल्याने याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

कळंब बस आगार तसा मराठवाड्यात उत्पन्नाच्या बाबतीत नंबर एक वरतीच आहे. पण मागील काही महिन्यापासून आगार व्यवस्थापक हे कायमस्वरूपी पदावर नेमणूक न झाल्यामुळे आगाराचे नियोजन दिवसेंदिवस ढासळत होते. पण मागील काही दिवसांपूर्वी एस. डी. खताळ हे आगार प्रमुखपदी नियुक्त झाले. त्यांनी पदभार घेतात सर्व कर्मचाऱ्यांना समान वागणूक, समान काम, समान दाम मिळावा म्हणून एक रोटेशन लावले होते. या रोटेशनमुळे अनेक कर्मचारी सुखावले होते. तर काही संघटनांचे कर्मचारी मात्र यामुळे दुखावले होते. अशातच कसा बसा एक महिना हा कार्यक्रम चालला. हे रोटेशन 2 ऑक्टोबर पासून चालू केले पण 3 नोव्हेंबर पासून याला मात्र काही संघटना व कर्मचाऱ्यांनी खोडा घातला. त्यामुळे पूर्ण नियोजन ढासळले. त्यामुळे काही कर्मचारी नाराज झाले. तर काही कर्मचारी खुश झाले. आगारप्रमुख एस. डी. खताळ यांनी आपला दबाव कर्मचाऱ्यावर निर्माण केला होता. पण त्याचा त्रास काहींना खूपच झाला. अशातच दिवाळीत कर्मचाऱ्यांना सुट्ट्या नाकारून स्वतःच अधिकारी सर्व सुट्टीवर निघून गेले अशी चर्चा कर्मचाऱ्यांत होत होती.  दिवाळीचा परतीचा प्रवास व कार्तिक वारी या दोन्हीमुळे कळंब स्थानकावर प्रचंड प्रवाशांची गर्दी आहे. यातच कळंब बस आगाराला वरिष्ठांनी एकही नवीन गाडी न दिल्याने सर्व संसार जुन्याच गाड्यावर चालू आहे. त्यात काही गाड्या वाटेतच ब्रेक डाऊन होतात. काही बस स्थानकाताच बंद पडतात. अशा या मोडक्या संसारात कर्मचारी मात्र जिद्दीने काम करून कळंब आगार उत्पन्नात कसा जास्त दिसेल याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. पण अधिकारी कर्मचारी यांच्यात समन्वय नसल्यामुळे प्रवाशांना मात्र याचा चांगलाच फटका बसत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्याने लक्ष देऊन कळंब आगाराची होणारी प्रचंड दुरावस्था दूर करावी. अशी मागणी प्रवाशातून जोर धरत आहे.


आम्ही सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेतो. त्यात कुठल्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही याची दक्षता आम्ही सदैव घेऊनच काम करतो. त्यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाते.

सहाय्यक वाहतूक अधीक्षक

बालाजी मुळे  

 
Top