पुणे (प्रतिनिधी) नागरिक शास्त्रात पी. एच. डी. करणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांना मी आवर्जून सांगेन, की मराठवाड्यातील  “दखल “ दिवाळी अंकाची “दखल“ घ्या ! तुम्हाला तो अभ्यासासाठी संदर्भ ग्रंथ ठरेल ; आणि या अंकातील, महाराष्ट्राच्या साधारण अर्धशतकी राजकीय परिस्थितीची माहिती तुम्हाला कुठेच मिळणार नाही. ते संदर्भ या अंकात तुम्हाला गवसतील, अशा ओजस्वी शब्दात ख्यातनाम मराठी साहित्यिक, समीक्षक, विद्वत्ताप्रचूर वक्ते, सक्षम समीक्षा त्रैमासिक संपादक, प्रकाशक, पी,एच.डी.अभ्यासक्रमाचे परिक्षक आणि महर्षि कर्वे शिक्षण संस्थेच्या सिध्दीविनायक महिला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. श्री शैलेश त्रिभुवन यांनी “ दखल “ 2024 दिवाळी अंकाचे पुणे येथील वारजे माळवाडी सभागृहात प्रकाशन करताना गौरवोद्गार काढले. 

या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दखल दिवाळी अंकाचे जुने लेखक व ज्येष्ठ पत्रकार श्री राजेश नाना काटे पाटील,तथा सिंहगड वाणिज्य महाविद्यालय लोणावळाचे निवृत्त प्राचार्य डॉ श्री सुधीर कुलकर्णी नायगावकर हे द्वय होते. तर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. बाळासाहेब यादव, टेक्साटाईलचे निवृत्त वरिष्ठ अधिकारी श्री बापूराव माडे, कसबा पेठेतील विचारवंत श्री प्रदीप चौधरी, ॲडव्होकेट दत्तात्रेय पाटील हे होते . 

राहुल निसर्ग ज्येष्ठ नागरिक संघाच्या विद्यमाने हा कार्यक्रम श्री रमेश वैजवाडे, रेणुकादास औंढेकर, आर.डी. मोघे, व आशिषकुमार राठी इत्यादींनी आयोजित केला होता. 

प्रथम नाना काटे यांनी डॉ. त्रिभुवन सर यांना विनंती केली की, सर तुम्ही आमच्या पुण्यनगरीचे विचक्षण व सत्यान्वेषी समीक्षक आहात, त्या मुळे आमच्या दखल या दिवाळी अंकाच्या सविस्तर समीक्षण, परिक्षणावर तुमचे विद्वताप्रचूर वक्तृत्व ऐकण्यासाठी येथे दर्दी व सुजाण लोक आवर्जून उपस्थित आहेत. म्हणून तुमच्या आधी व नंतर कोणीही बोलणार नाही. म्हणून सगळा वेळ तुम्हालाच दिलेला आहे!

या नंतर डॉ. त्रिभुवन सर यांनी आपल्या समिक्षेला प्रारंभ केला. या वेळी त्यांनी सांगितले की माझे साहित्याचे वाचन तुम्हाला माहिती आहे. माझ्याकडे जवळपास दहा हजार ग्रंथ, पुस्तके आहेत. पण मला इतर कार्यबाहुल्यामुळे आताशा वाचण्यासाठी वेळ काढणे दुरापास्त होते आहे. परंतू आदरणीय नानांनी प्रकाशनापुर्वी मला आधले दिवशी हा दखल दिवाळी एक अंक दिला. आणि आज्ञा केली की, उद्या तुमच्या हस्ते या अंकाचे प्रकाशन करावयाचे आहे. त्या वेळी तुमचे समीक्षण, परिक्षण अपेक्षित आहे. आणि म्हणून मी, खरेतर मुखपृष्ठावर पद्मश्री नारायण सुर्वे विराजमान झालेले पाहिले, व आधाशासारखा सर्व अंक आधी एकटाकी पध्दतीने वाचून काढला. आणि आज वेळेपुर्वी येथे माझ्या उपस्थितीची वर्दी दिली.

ते पुढे म्हणाले की, प्रथम मी सांगू इच्छितो की हा “ दखल दिवाळी अंक “ मला खूप भावला. त्यातील साहित्य ओजस्वी असून लेखक मंडळी कौतुकास पात्र आहेत. आणि संपादक श्री गणेश शिंदे यांची वाङ्मयीन गुणवत्ता व लेख निवडीतील जाण किती श्रेष्ठ दर्जाची आहे, याची प्रचिती आली. संपादकांचा माझा परिचय ही नाही. ते नानांचे मित्र आहेत. तरीही त्यांनी दिवाळी अंक कसा असावा याचा वस्तुपाठ घालून दिला आहे, हे मात्र निश्चित. नाहीतर आजकाल नागरी दिवाळी अंकाचा वाङ्मयीन दर्जा, वैचारिक निकष या बाबतीत एकंदरीत सगळा आनंदी आनंदच आहे. त्या तुलनेत धाराशिव सारख्या ग्रामीण भागातून निघणाऱ्या 'दखल' सारख्या दिवाळी अंकातून भरपूर विचार प्रवर्तक मेजवानी पुरविली आहे, हे महत्त्वाचे आहे! संपादक, ज्येष्ठ व प्रथितयश पत्रकार असून त्यांनी हा अंक काढू पुण्यामुंबैच्या साहित्य क्षेत्रास, “ दखल “ घेण्यास भाग पाडले आहे, प्रवृत्त केले आहे! म्हणून नानासाहेबांनीही या अंकाचे पुणे या साहित्य पंढरीत प्रकाशन ठेऊन, “ दिवाळी अंक स्वरुप,गुणवत्ता “ या विषयाला तोंड फोडले आहे!

संपादक गणेशजींनी विशेषत: मुखपृष्ठावर “ भाकरीत चंद्र शोधताना “ या पद्मश्री कविराज नारायण सुर्वे यांच्या काव्याची योग्य दखल घेऊन ऐरणीवर आणले आहे. मराठी भाषेतील कोण्याही दिवाळी अंकाने, संपादकाने मुखपृष्ठावर कधी कोण्या साहित्य-काव्याला  यापूर्वी स्थान दिलेले नाही. ते स्थान महाकवी नारायण सुर्वे यांना शिंदे यांनी देऊन न्याय दिलेला आहे ! उलटपक्षी इतर बहुतांशी दिवाळी अंक ,'छापणाऱ्या ' कर्मकारांनी ,साहित्याच्या दरबारात उत्तान व बटबटत्या शृंगारिक स्त्रियांच्या प्रतिमा छापून निरीच्छ संतांच्या वैचारिक महाराष्ट्राची शरमेने मान झुकवून चंगळवादी प्रवृत्ती कायमस्वरूपी जोपासलेली आहे ! त्या प्रवृत्तीच्या तुलनात्मकदृष्ट्या गणेशजी शिंदे यांनी निखळ वैचारिक साहित्य-काव्य यांस महत्त्व देऊन  मराठवाड्याची जातकुळी दाखवून दिली आहे. व चंगळवादी प्रवृत्तीच्या डोळ्यात अंजन घातले आहे, ते खचितच गौरवास्पद आहे. त्याबद्दल त्यांना शतशः धन्यवाद!

या अंकात नानांचे दोन लेख असून निरनिराळ्या तात्विक इझम कडे पत्रकारांची दृष्टी व भूमिका कशी त्रयस्थ, निकोप असावी, याचा नवीन पिढीस लोकशाही च्या चौथ्या आधारस्तंभास, पत्रकारांना वस्तुपाठ व दिशा घालून दिली आहे. ते मार्गदर्शक व मोलाचे ठरावे. नानांनी एका लेखात उजवी पाती व कट्टर हिंदुत्ववाद समर्थक नेते व जनसंघाचे आमदार रामभाऊ म्हाळगी यांच्यावरील लेखाने आक्रस्ताळ्या डावखुरी प्रवृत्तीवर शांत, संयमी उजवी बाजू गुणवत्तेत कशी मात करते, म्हणून जनमानसाला कशी भावते आणि तिचा कसा अंगिकार केला जातो आहे व डाव्यांना कां पराभवाच्या गर्तेत खितपत रहावे लागत आहे, ते पुन:श्च अधोरेखित केले आहे. तद्वतच अर्धशतकापुर्वी महाराष्ट्राची एकूणच राजकीय संस्कृती किती निकोप व निखळ लोकशाही वादी होती व त्या तुलनात्मकदृष्ट्या आजची राजकीय अवस्था किती रसातळाला गेली आहे, हे ही उजागर होते! त्या वेळी जर रामभाऊंनी सोपान साळवे यांच्या प्रश्नांचा राजकीय लाभ घेण्यासाठी अ-लोकतांत्रिक व अशिष्ठ पध्दतीने, आक्रस्ताळेपणाने त्याचा वापर केला असता व ते सहजगत्या तसे करुं शकत होते.... कारण परिस्थिती अशी होती की  म्हाळगींना त्या वेळी उमगले होते की, मुख्यमंत्री वसंतराव नाईक सभागृहात चक्क खोटे बोलत आहेत ! कारण तत्कालीन उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांचा सोपान विषयी दूरध्वनी वा संदेश आलेलाच नव्हता ! रामभाऊंनी तो विषय तेथेच लावून धरला असता व मुख्यमंत्र्यांना संदेश दाखवा म्हणून,  त्यांनी त्याचा स्वार्थी दृष्टिकोनातून फायदा लाटण्याचा प्रयत्न केला असता तर ... सरकार पडत होते, पडले असते!! परंतू रामभाऊंनी ते लोकशाहीचे हत्यार न वापरता केवळ स्मितहास्यांने मुख्यमंत्री नाईकांना जाणवून दिले की निकोप लोकशाही काय असते ! कारण प्रश्नांचे अनाठायी राजकीय भांडवल न करता जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत, त्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे, ही रामभाऊ म्हाळगींची उच्चतम प्रवृत्ती होती. गुणवत्ता होती. ती उजवी असूनही डावखुरी पेक्षा सरस होती, श्रेष्ठ होती, हे नानांनी समाजासमोर आणले! 

एक मात्र सत्य की, म्हाळगींनी विधीमंडळाच्या पटला वरुन सोपानला न्याय मिळवून दिला! म्हणूनच दरवर्षी  पाशवी बहुमताच्या काँग्रेसच्या काळातही , “ आदर्श लोकप्रतिनिधी “ हा सन्मान रामभाऊ म्हाळगी यांच्या कडे आपसूकच कसा चालत नव्हेतर दौडत यायचा ! हा त्याचा अर्थ अन्‌‍ अन्वयार्थ आहे! 

तर दुसऱ्या लेखात सव्यसाची पत्रकार नानासाहेबांनी काँग्रेसच्या डावखुऱ्या बहाद्दर नेत्या आयर्न लेडी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या महानतेला गवसणी घातली आहे! आणि त्या लेखाच्या अनुषंगाने, एक राजकीय प्रमेय ठळकपणे उजागर होते की, जनसामान्य पक्षोपक्षाच्या तात्विक व वैचारिक धारणेला एव्हढा महत्त्व देत नसतो! तो फक्त काम करणाऱ्या नेत्यांच्या मागे जातो. हे प्रमेय पंतप्रधान इंदिराजींच्यासाठी प्रचंड व अमर्याद संख्येने ओसंडून धावणाऱ्या लोक समुहाने सिध्द होते! अधोरेखित होते! जनतेचे ओसंडून वहाणारे प्रेम व आस्था पाहून इंदिरा गांधी भावविवश झाल्या आणि त्या उर्मीने त्या कळंब मध्ये जमलेल्या जनतेला म्हणाल्या की, “ इस कठीण वख्त़ के चलते , आवश्यकता रही तो हम भूखे रहेंगे लेकीन आप भाईबहनोके लिये अनाज पाणी भेजेंगे| डरने की, चिंता की कोई बात नही,जरुरत नही! 

रोजी रोटी के लिये पैसा निधी अनुदान,  हम कम नही होने देंगे| 

यह हमारा वादा है, अभिवचन है|  या उद्गारातच सर्व अनुस्युत आहे! 

या अंकातील इतर लेखही केवळ पहानीय नसून वाचनीय आहेत.

विशेषतः लाडकी बहिण या बाबतचे दोन्ही लेख, पहिल्या लेखात ऐड. जयश्री तेरकर यांनी स्त्री सक्षमीकरणाची सकारात्मक बाजू उत्कृष्ट प्रतिपादन केली आहे. तर संजीव चांदोरकर यांनी दिवाळखोरीचा,   सावध! ऐका पुढल्या हाका , असा इशारा दिला आहे. पण एका वाचक बहिणीने त्यावर खोचक प्रतिक्रिया नोंदविली आहे. ती म्हणते , “ बरं, आमच्या टायमाला तुम्हाला हे आठवतं, सरकारी नोकरांच्या पगारी भरमसाठ वाढविल्या तवा नाही म्हणत पुरेसे पैसे आहेत कां? तेंव्हा म्हणतात,ते खर्च करावेच लागतात. आमच्या साठी कांहीं केलं की, म्हणतात, कल्याणकारी योजना ऑप्शनल असतात “ !

दलीत लोक काय खातात, हा प्रश्न ऐरणीवर आणून शाहु पाटोळे यांनी वाचकांचे मन विषण्ण केले आहे. तर संगीता शिवेश्वरकर यांनी, माणसांच्या मनात देव उभा राहिला तर कांहींच अशक्य नाही, हा ममताताईंचा दृढ विश्वास आशावादी ठरवला आहे. अमर हबीब यांनी धर्म जात या तीव्र संकल्पना इतर नैतिक मुद्द्याला कसे गिळंकृत करतात ही खंत मांडली आहे. तद्वतच दलीत चळवळीची वाताहत झाल्याने डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न कसे अपुर्ण राहिले याची वेदना पत्रकार मित्रजित रणदिवे यांनी समाजा समोर आणली आहे. तेजपाल सावरीकर यांनी गरीब स्त्रीचे सौंदर्यही कसे घृणास्पद ठरते ते कुण्या एकाच्या मावशीच्या कथेत गुंफले आहे. एकंदरीत इतर विविध विषयांवरील लेखही, ' दखल पात्र ' आहेत, विचार प्रवर्तक आहेत. 

पण दिवाळी अंकाचे वैशिष्ट्य ठरले आहे, ते म्हणजे, विनोद ! या बाबीला संपादकांनी अजिबात थारा दिला नाही. कारण विनोदाची मातृदेवता ही शृंगार, आणि ती हळूहळू पुढील पायऱ्या पादाक्रांत करत, बिभित्सपणा, उत्ताणपणा, नंगानाच व शेवटी चंगळवादात जाऊन हुंदडते; असे सद्यस्थितीत त्याला स्वरुप दुर्दैवाने आलेले आहे, म्हणून संपादकांनी त्यास फाटा दिला आहे.  इतर संकलित माहितीची निवड ही ठीकठाक आहे.

मात्र क्षुल्लक चाळीस रुपये किंमतीत हा दिवाळी अंक वाचकांना पुरविण्यात संपादकांनी गणित कसे जमविले आहे, हे अनाकलनीय आहे.

परंतू शेवटी जनमानसांच्या हृदयाला , काळजाला हलवून अंततोगत्वा विचार करायला लावण्यात, व दखलची दखल घ्यायला लावण्यात संपादक कमालीचे यशस्वी ठरले आहेत, हे निर्विवाद! त्या बध्दल गणेशजींचे पुनःश्च अभिनंदन ! शेवटी आभार प्रदर्शनानंतर दिवाळीच्या फराळात गुंग होऊन सर्वांनी मिळून प्रमुख वक्ते डॉ. श्री शैलेश त्रिभुवन यांना हार्दिक हार्दिक धन्यवाद व शुभकामना दिल्या.

 
Top