धाराशिव (प्रतिनिधी)- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक - 2024 करिता येत्या 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजतापर्यंत जिल्ह्यातील सर्व चारही विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.या निवडणुकीत जास्तीत जास्त संख्येने मतदान व्हावे, यासाठी मतदान जागृती कार्यक्रमांतर्गत गुरुवार 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता धाराशिव येथे “ रन फॉर व्होट “ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.या रॅलीचा शुभारंभ 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून होणार आहे. या रॅलीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलिस अधीक्षक संजय जाधव यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी सहभागी होणार आहे.
रन फॉर व्होट रॅलीला जिल्हाधिकारी कार्यालय येथून सुरुवात होणार आहे. ही रॅली मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, राजमाता जिजाऊ चौक, संत गाडगेबाबा चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचून रॅलीचा समारोप होणार आहे.तरी या रॅलीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.