धाराशिव (प्रतिनिधी) - विकासाची दृष्टि ठेवून व्यापक लोकहितासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहणे ही आपल्या कामाची पध्दत आहे. तत्कालीन ठाकरे सरकारमुळे आपल्या जिल्ह्यातील अनेक लोकहिताच्या प्रकल्प आणि योजनांना मोठी खीळ बसली होती. मागील 24 महिन्यांच्या कालावधीत सतत पाठपुरावा करून जिल्ह्याचा कायापालट करण्याची क्षमता असलेले अनेक महत्वपूर्ण प्रकल्प आणि योजना आपण पूर्णत्वाच्या दिशेने पुढे नेल्या आहेत. जिल्ह्यातील कौशल्य असलेल्या तरूणांना जिल्ह्यातच काम मिळावे, यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नांना आता यश आले आहे. पर्यटन विकास, नवीन रेल्वेमार्ग, तामलवाडी एमआयडीसी आणि कौडगाव येथील टेक्निकल टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून पुढील काळात 35 हजाराहून अधिक रोजगार निर्मितीचे आपले उद्दिष्ट आता नजरेच्या टप्प्यात आले असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
तुळजापूर येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या युवकांच्या मेळाव्यात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी महायुतीच्या कार्यकाळात तुळजापूर विधानसभा मतदारसंघ आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या अनेक जनहितांच्या प्रकल्प आणि योजनांची माहिती दिली. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राला वैश्वीक पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा, यासाठी आपण स्वप्न पाहिले. त्याचा पाठपुरावा केला. केंद्रातील आपले सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने त्याला पाठबळ दिले आणि आता दोन हजार कोटी रूपयांचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतिम झाला आहे. तुळजापूर शहरात राज्य, देश आणि जगभरातून आलेल्या दहा हजाराहून अधिक पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था करण्याचा आपला प्रयत्न आहे. मुक्कामी आलेल्या भाविकांची संख्या वाढल्यानंतर होणारी आर्थिक उलाढाल तुळजापूर शहर आणि परिसराच्या अर्थकारणाला मोठी गती देईल. त्यातच सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्गाचे काम पुढील 24 महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आपण बाळगले आहे. कृष्णा खोऱ्याचे पाणी, तामलवाडी एमआयडीसी आदीबाबत आपण काम करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.