तुळजापूर (प्रतिनिधी)- शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला अभिप्रेत असणारे सभ्य नागरिक निर्माण होणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन प्रा विवेकानंद चव्हाण यांनी केले. तुळजापूर येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित तुळजाभवानी शिक्षणशास्त्र महाविद्यालय तुळजापूर येथे शिक्षक दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रा. चव्हाण बोलत होते. प्रारंभी प्राचार्य दोंड यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रा. चव्हाण पुढे म्हणाले की, जेंव्हा शिक्षक एखादी कथा वर्गात शिकवत असतात तेंव्हा विद्यार्थी त्या कथेतील आदर्श शोधत असतात. शिक्षकांनी समाजाच्या प्रगल्भतेसाठी आदर्श निर्माण करणे गरजेचे आहे. जेणेकरून समाजातील प्रत्येक व्यक्ती स्त्री असो वा पुरुष सामाजिक दृष्ट्या सुरक्षीत होतील. समाजातील अंधश्रद्धा अजुनही कांहीं प्रमाणात टिकून आहेत. स्त्रीयांच्या शिक्षणाकडे पहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक नाही. कारण स्त्रीयांना सामाजिक सुरक्षितता समाजात मिळत नाही. डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा शिक्षणाविषयी दृष्टीकोन प्रगतीस अनुसरून होता. नवीन शैक्षणिक धोरणाची पाळे मुळे त्यांच्या विचारातुन जाणवतात.देशातील तरुणांनी सामाजिक भान मनात ठेऊन देशाप्रती व समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे. असे सूतोवाच त्यांनी यावेळी केले.
अध्यक्षीय समापनाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य दोंड म्हणाले की, समाजातील सामाजिक विषमता शिक्षणामुळे दूर होते.ही जबाबदारी खऱ्या अर्थाने शिक्षकांची आहे.नवीन शैक्षणिक धोरणानुसार तंत्रज्ञानाचे ज्ञान शिक्षकांनी जोपासने गरजेचे आहे. शिक्षकांनी मानसिक द्वंद्वात्मक अवस्थेत राहू नये.समोरच्या व्यक्तीची सकारात्मक बाजू समजून घेऊन अध्यापनाचे कार्य करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अरुण चौधरी यांनी केले. तर पाहुण्यांचा परिचय मुग्धा क्षीरसागर हिने केला. तसेच श्वेता इंगळे, तनुजा भोसले, अवंतिका काळे, प्रीती जाधव, श्रध्दा पवार, स्नेहा गोडवे, प्रिया आगलावे, शिवानी पवार, रोहिणी डाके या विद्यार्थिनींनी देखील प्रभावीपणे आपले मनोगते व्यक्त केले. सदर प्रसंगी प्रा उल्हास झालटे, प्रा. विवेक कोरे, प्रा. डॉ.मंत्री आर आडे, यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. विवेक कोरे, प्रा. सुनंदा कोळी, श्रीमती स्वाती गरदडे, संजय गंभीरे, यांचे उत्तम सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पायल झांबरे हिने तर आभार तनुजा भोसले हिने मानले.