उमरगा (प्रतिनिधी)- चांगला माणूस घडवणे हेच शिक्षकांचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन यजुवेंद्र महाजन यांनी केले. आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या ज्ञानज्योती बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित शिक्षक दिनानिमित्त उमरगा व लोहारा तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील उपक्रमशील शिक्षकांचा शिक्षकरत्न पुरस्कार सोहळा शांताई मंगल कार्यालय उमरगा येथे उत्साहात संपन्न झाला. 

या कार्यक्रमास उपस्थित शिक्षक व शिक्षणप्रेमी नागरिकांना दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल, जळगाव पुणेचे यजुवेंद्र महाजन यांनी मार्गदर्शन केले. मागील 15 वर्षांपासून उमरगा लोहारा तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी “ज्ञानज्योती“ च्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अविरतपणे कार्य करीत असून गुणवंत विद्यार्थी सत्कार, मार्गदर्शन मेळावे, शिक्षकरत्न पुरस्कार, आरोग्य शिबीर आदी कार्यक्रम राबवित आहोत. संस्थेच्या वतीने चालू करण्यात आलेल्या मोफत अभ्यासिकेतून मागील 2 वर्षांत 40 युवक-युवती शासकीय सेवेत विविध पदावर रुजू झाले आहेत याचा मनस्वी आनंद वाटतो, असे मत आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जितेंद्र शिंदे, उद्घाटक सुधा साळुंके, प्रमुख पाहुणे म्हणून किरण गायकवाड, शिवकुमार बिराजदार, सुभाष चव्हाण यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक बळीराम घोरवडे, आर.व्ही.पाटील, सुनंदा निर्मळे, जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त पुष्पलता पांढरे, हरिबा शेके यांच्यासह विलास कुलकर्णी यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष गौरव सत्कार करण्यात आला. 

काही दिवसांपूर्वी ब्रेन डेडने दुर्दैवी मृत्यू झालेल्या उमरगा शहरातील कै.पृथ्वीराज वरवटे या 15 वर्षीय विद्यार्थ्याच्या पालकांनी अवयवदानाचा धाडसी निर्णय घेतल्याने त्याच्या पालकांचा विशेष सन्मान केला. कुटुंबातील दुसऱ्या मुलाच्या शिक्षणासाठी ज्ञानज्योती कडून 50 हजार रुपयांची अनामत रक्कम मदत यावेळी देण्यात आली. कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष विजय वडदरे, सचिव प्रदीप मदने, यांच्यासह शिक्षणप्रेमी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जगताप, महेश अचिंतलवाड यांनी व आभार प्रदर्शन ॲड.आकांक्षा चौगुले यांनी केले.

 
Top