उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा शहरातील पतंगे रोड व मदनानंद कॉलनी भागातील या दोन ठिकाणी राहणाऱ्या मुलांना तीन दिवसात डेंग्यूच्या आजाराने या दोघांचा मृत्यू झाल्याने शहरातील आरोग्य सुविधा चव्हाट्यावर आली आहे.
शहरातील पतंगे रोड लगत असलेला स्वामी विवेकानंद शाळेतील विद्यार्थी सत्यजित हणमंत देशमुख वय 12 वर्षे याला शनिवारी दि.24 ऑगस्ट रोजी घशात खवखव होत असल्याने व ताप आल्याने शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचा ताप कमी होत नसल्याने सोमवारी त्याच्या रक्ताची तपासणी केली असता डेंगू झाल्याचे सांगण्यात आले. नंतर त्याला पुढील उपचारासाठी मंगळवारी सोलापूर येथिल खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्याचा ताप अधिक वाढला. सोलापूर येथे उपचार चालू असताना शनिवारी पहाटे (दि. 31) रोजी त्याचा मृत्यू झाला. दुपारी शहरातील वैकुंठ धाम स्मशानभूमीत अत्यं संस्कार करण्यात आले. तर दुसऱ्या घटनेत शहरातील मदनानंद कॉलनी येथे राहणारे शिवाजी साळुंखे यांचा मुलगा ओम शिवाजी साळुंखे (वय 18 वर्षे) हा पुण्यात तंत्रनिकेतन मध्ये शिकत होता. रक्षा बंधन सणाच्या निमित्ताने तो उमरगा येथे आई वडिलांकडे आला. त्याला ताप आल्याने गुरुवारी दि. 22 ऑगस्ट रोजी शहरातील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी तपासणी केली असता डेंग्यूचा पॉजीटीव रिपोर्ट आला. त्यानंतर त्याला उपचारासाठी शनिवारी दि. 24 ऑगस्ट रोजी सोलापूर येथिल यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दि. 26 ऑगस्ट सोमवारी तो कोमात गेला. उपचार चालू असताना गुरुवारी सायंकाळी दि. 29 ऑगस्ट रोजी मरण पावला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
शहरात असणारे उपजिल्हा रुग्णालयात आणि इतर खाजगी रुग्णालय असूनही रुग्णाला वाचवू शकले नाहीत.शिवाय पालिकेची साफ सफाईची मोहीम पूर्णतः थंडावली आहे. पालिकेत पूर्णवेळ मुख्याधिकारी नसतात, नागरिकांना समस्या कोणाकडे मांडायच्या हा प्रश्न भेडसावत आहे. शहरातील गटारी तुंबलेल्या आहेत. नाले सफाई केली जात नाही कचरा उचलला जात नाही. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शहराला कोणीही वाली राहिला नाही अशी तीव्र प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त केली जात आहे.