नळदुर्ग (प्रतिनिधी)- सध्या पडत असलेल्या पावसामुळे नळदुर्ग येथील बोरी धरण पाण्याने तुडुंब भरले आहे. दि. 25 सप्टेंबर रोजी हे धरण पुर्ण भरल्याने धरणाचा सांडवा सुरु झाला आहे. धरण भरल्यामुळे धरणातील नवीन पाण्याचे जलपुजन नळदुर्ग शहर पत्रकार संघ व शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आले. धरण भरल्यामुळे नळदुर्ग शहरासह तीर्थक्षेत्र तुळजापुर व अणदुरसह इतर गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
सध्या बोरी धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने दि. 25 सप्टेंबर रोजी बोरी धरण पाण्याने तुडुंब भरले असुन धरणाचा सांडवा सुरु झाला आहे. सांडवा पुर्ण क्षमतेने सुरु झाला नसला तरी येत्या दोन दिवसात हा सांडवा पुर्ण क्षमतेने सुरु होऊन ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यातील नेत्रदीपक म्हणुन ओळखले जाणारे शिलक आणि नर-मादी धबधबा सुरु होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे बोरी धरण भरले नव्हते. त्यामुळे किल्ल्यातील शिलक व नर- मादी धबधबा सुरु झाले नव्हते. त्यामुळे किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची घोर निराशा झाली होती. मात्र यावर्षी बोरी धरण भरल्यामुळे हे धबधबे पुर्ण क्षमतेने प्रवाहीत होण्याच्या आशा उंचावल्या आहेत.
बोरी धरण भरल्यामुळे नळदुर्ग शहरासह तुळजापुर, अणदुर व इतर गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. त्याचबरोबर धरण क्षेत्रातील शेतीच्या सिंचनाचा प्रश्नही आता मिटला आहे. धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांना आता कालव्याद्वारे रब्बी तसेच उन्हाळी पिकासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. बोरी धरण भरल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे.
दि. 25 सप्टेंबर रोजी नळदुर्ग शहर पत्रकार संघ व शहर शिवसेनेच्या वतीने धरणातील पाण्याचे जलपुजन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव तसेच पत्रकार विलास येडगे यांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले. यावेळी शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, सचिव तानाजी जाधव, लतिफ शेख, शिवाजी नाईक, भगवंत सुरवसे, दादासाहेब बनसोडे, अजित चव्हाण, माजी नगरसेवक सुधीर हजारे, सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे आदिजन उपस्थित होते. शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख कमलाकर चव्हाण यांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले. यावेळी उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकुर, शहर प्रमुख संतोष पुदाले, उपशहरप्रमुख शाम कणकधर आदिजन उपस्थित होते.