कळंब (प्रतिनिधी)- तालुक्यातील लोहटा (पश्चिम), ता. कळंब, जि. धाराशिव या ठिकाणी महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे विधी सेवा चिकित्सालयाची स्थापना करण्यात आली. सदरील विधी सेवा चिकीत्सालयाचे उद्घाटन दिनांक 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय कळंब येथील जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती कळंब आर. के. राजेभोसले यांच्या हस्ते पार पडले.
सदरील कार्यक्रमाच्या अनुषंगाने बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष आर. के. राजेभोसले यांनी उपस्थित सर्व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या विविध योजनांची माहिती देशातील तळागाळातील लोकांना होण्यासाठी व सदर योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी या हेतूने प्रत्येक तालुक्यामध्ये विधी सेवा चिकीत्सालय स्थापन करण्यात आल्याचे सांगितले. सदरील विधी सेवा चिकीत्सालय हे प्रत्येक रविवारी चालू राहणार असून त्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच सध्याच्या युगात आयुष्य हे क्षणभंगुर असल्याने आपआपसातील वाद हे सामंजस्याने मिटवून घेणेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करून विधी सेवा चिकीत्सालयाचे महत्त्व पटवून दिले. त्याचप्रमाणे मुलींचे शिक्षण व विविध कायदेविषयक बाबी याविषयी बहुमुल्य असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. बी. बी. साठे यांनी केले. तर जेष्ठ विधीज्ञ ॲड. टी. बी. मनगिरे यांनी उपस्थितांना कायद्याविषयी जाणिव करून दिली. तिसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एम. ए. शेख यांनी विधी सेवा प्राधिकरणाबाबत माहिती देवून लोकन्यायालयात आपआपसातील तंटे मिटवून घेणेबाबत आवाहन उपस्थितांना केले.
सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर. के. राजेभोसले जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती कळंब हे तर प्रमुख पाहुणे म्हणून कळंब न्यायालयातील तिसरे सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर एम. ए. शेख, विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. बी. बी. साठे, महिला उपाध्यक्ष ॲड. कु. डी. ए. कांबळे, जेष्ठ विधीज्ञ ॲड. टी. बी. मनगिरे, ॲड. एस. वाय. काळे, ॲड. ए. सी. चोंदे, ॲड. ए. एन. गवळी, ॲड. एस. आर. पवार, विधी स्वयंसेवक एस. यु. लोकरे, पंचायत समिती येथील विस्तार अधिकारी निवास शिंदे, ग्रामसेवक सुरेश धावारे, लोहटा पश्चिम गावचे सरपंच सौ. स्वाती आडसूळ, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पॅनल विधीज्ञ ॲड. एस. आर. पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य संजय आडसूळ यांनी केले.